
खऱ्या फुलांसारखी हुबेहूब दिसणारी कागदी फुले तयार करणे ही एक अनोखी कला आहे. तारिणी केदार -गीध हिने ही कला लहानपणापासून जोपासली आहे. तिच्या ‘पॅशन’चे व्यवसायात कधी रुपांतर झाले हे तिलाच कळले नाही. आज यशस्वी ‘पेपर फ्लॉरिस्ट’अशी तिची ओळख झाली आहे. जेट एयरवेजच्या नोकरीला रामराम ठोकून तिने पूर्ण वेळ कलेला वाहून घेतले. तारिणीने स्वत:पुरते या कलेला मर्यादित ठेवलेले नाही. ती अनेकांना कागदी फुले बनवण्याचे धडे देत आहे.
वांद्रे येथील तारिणी गीध विविध प्रकारची आकर्षक कागदी फुले तयार करते. वयाच्या 79व्या वर्षीही कागदी फुले तयार करणाऱ्या माणिक बोंद्रे यांच्याकडून तारिणीने ही कला आत्मसात केली. खरंतर तारिणीची आई श्रद्धा खेडेकर यादेखील आर्टिस्ट आहेत. त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून ‘मास्टर्स’ केले आहे. त्या ऑरगंडी फुले बनवायच्या. त्यांच्यामुळेही तारिणीला कागदी फुलांचा छंद जडला. गेल्या 10 वर्षांपासून तारिणी हा छंद जोपासत आहे. त्यातच तिला करियरचा वेगळा मार्ग गवसला. तिच्या कलेचे हळूहळू कौतुक होऊ लागले. वाढदिवस, लग्न समारंभ, भेटवस्तू, सजावटीसाठी तिच्याकडे पेपर फ्लॉवर्सची मागणी येऊ लागली. तिचा छंद व्यवसायात बदलला. केवळ कागदी फुलेच नव्हे तर पेपरचे बुकमार्क, फ्रीज मॅग्नेट, क्ले मॅग्नेट, वारली पेंटिंग, अव्रेलिक पेंटिंग, गोंड आर्ट, कागदी-क्विलिंग इयररिंग, डेकॉपॉज आदी विविध हस्तकौशल्यांमध्ये ती पारंगत झाली. घरोघरी जाऊन याचे प्रशिक्षणही तिने द्यायला सुरुवात केली.
– लॉकडाऊनमध्ये घरी असताना मन कशात तरी गुंतून रहावे म्हणून अनेकांनी नानाविध छंद जोपासले. एकमेकांना प्रत्यक्ष भेटता येत नसल्याने ऑनलाईन माध्यमातून लोकांनी नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी तारिणीकडे कागदी फुलांची कला शिकून घेण्याची इच्छा व्यक्त केली. लॉकडाऊनमध्ये तारिणीने झूम अॅपच्या माध्यमातून कागदी फुले तयार करायला शिकवली. तारिणीच्या क्लासमध्ये शिकागोवरूनही एक महिला सहभागी व्हायची.
– टी रोझ, डॅफोडील, वाईल्ड फिलर, पॅरनेशन, गार्डन कॉसमॉस, आईसलॅण्ड पॉपी, कॉसमॉस, सोनचाफा, बर्ड ऑफ पॅराडाईज, पॅरेट टय़ुलीप, लिली, मॅंगोलिया, जर्बेरा, बोगनविला, आयरिस, एंजल्स ट्रंपेट, पियोनी अशी देशविदेशातील फुले डुप्लेक्स व्रेप पेपरपासून कशी बनवायची याचे प्रशिक्षण तारिणी देते.
– कागदी फुले निर्मितीचा छंद अनेक जण जोपासतात. सेवानिवृत्तीनंतरचा छंद म्हणून काही जण त्याच्याकडे बघतात. सध्याच्या काळात वर्क फ्रॉम होम करताना मल्टी टास्पिंग किंवा ज्यादा कमाईचे साधन म्हणूनही लोक या कलेकडे वळले आहेत. भेटवस्तू बनवण्यासाठी, रुखवताच्या वस्तू बनवण्यासाठी ही कला शिकून घेतात, अशी माहिती तारिणीने दिली.


























































