
सामना प्रतिनिधी । जालना
लहान मुलांचे अपहरण करत असल्याच्या संशयावरून मंठा येथील बसस्थानकावर दोन संशयित महिलांना गावकऱ्यांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर काही वेळातच दोनशे ते तीनशे जणांच्या जमावाने मारहाण करीत दोन तरूणांना पोलीस स्टेशनमध्ये आणले परंतु तपासाअंती सर्व संशयित निरपराध निघाल्याने त्यांना सोडुन देण्यात आले.
आज १६ जून रोजी बसस्थानकात सकाळी ११ च्या सुमारास भीक मागणाऱ्या दोन संशयित महिला नागरिकांना आढळून आल्या. यातील एक महिला बुरखाधारी होती. सध्या सोशल मिडीयावर मुले पळविणारी टोळी फिरत असल्याची अफवा फिरत असल्यामुळे नागरिकांचा संशय बळावला. उपस्थित काही नागरिकांनी प्रश्नांची सरबत्ती करताच बुरखाधारी महीला गोंधळुन गेली. त्यानंतर जमावांने त्यांना बेदम चोप दिला व पोलिसांशी संपर्क केला. पोलीसांनी सदर महिलांना ठाण्यात आणताच अफवांना पेव फुटले. त्यानंतर काही वेळातच दुसरी घटना घडली.
यावेळी ईदच्या निमित्ताने भीक मागणारे दोन संशयित तरूण दिसुन आले. त्यांनाही मारहाण करीत नागरिकांनी पोलीस ठाण्यात आणले. शहानिशा केल्यानंतर असे लक्षात आले की, ईदनिमित्ताने खैरात मागण्यासाठी हे चारही संशयित शहरात फिरत होते. यातील सविता राजू चव्हाण ही चारठाणा येथील रहीवाशी असुन हेमा भगवान पवार ही लोणार तालुक्यातील बुऱ्हाणपुर येथील रहीवाशी असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांच्या नातेवाईकांशी संपर्क केल्यानंतर ते पोलीस ठाण्यात हजर
झाले. त्यांनी दोन्ही महिलांचे आधार कार्ड दाखवुन ओळख पटवली. दुसऱ्या घटनेतील तरूण वाटुर येथील रहीवाशी असुन त्यांची नावे सचिन रामभाऊ पाटोळे व संभाजी संजय पारखे आहेत. त्यांच्याही ओळखीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली.
या घटनेनंतर मंठा येथील पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी असे आवाहन केले आहे की, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संशयित आढळून आल्यास पोलिसांना खबर द्यावी व पोलिसांच्या स्वाधीन करावे. त्यांना
मारहाण करून कायदा हातात घेऊ नये. शहरातील शांतता कायम राहण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.































































