जालन्यातील शासकीय महिला व बाल रुग्णालयातून बाळाची चोरी; शहरात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालन्याच्या शासकीय महिला व बाल रुग्णालयातून रविवारी रात्री जन्मलेल्या बाळाची चोरी झाल्याची घटना समोर आली. जालना तालुक्यातील पारेगाव येथील रुकसाना अहेमद या महिलेला प्रसूतीसाठी महिला व बाल रुग्णलायत दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री 11 वाजता या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. दुसऱ्या दिवशी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी एका महिलेने बाळाला गरम पाण्याने आंघोळ घालण्यासाठी पाणी देते असे सांगत रुकसानाच्या जावेला पाणी आणून दिले.

रुकसाना यांची जाऊ बाहेर जाताच या महिलेने बाळाला घेत पोबारा केल्याचा आरोप रुकसानाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि कदीम जालना पोलिसांनी परिसरातील रेल्वे स्थानक आणि विविध ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासून शोधकार्य सुरू केले आहे. घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश टाक यांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

जिल्हा महिला रुग्णालयात घडलेला हा प्रकार प्रशासनाचा बेजबाबदारपणा असल्याचे सांगत संताप व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून लवकरात लवकर पीडित महिलेस न्याय द्यावा, अशी मागणी पारेगाव येथील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. या घटनेने शासकीय महिला व बाल रुग्णालय परिसरात खबळ उडाली आहे. वार्डातून बाळाची चोरी झाल्याने रुग्णालय परिसराच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. महिला स्त्री रुग्णालयाच्या बाहेरील परिसरात रूग्णालयाचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संपूर्ण घटनेचा तपास सुरू असताना महिला रिक्षामध्ये बसून रेल्वे स्थानकाकडे गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आरोपी महिला परभणी गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे.