पित्ताशयातील खडे

गेल्या काही वर्षांत पित्ताशयात (गॉल ब्लॅडर) खडे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. यात विशेष औषधे नाहीत असे सांगून शस्त्र्ाक्रिया करून अख्खे पित्ताशयच काढून टाकण्याचा सल्ला आधुनिक वैद्यकांकडून दिला जातो. आयुर्वेदात मात्र यावर उत्तम उपाय आहेत आणि ऑपरेशनही टाळता येते.

पित्ताशयात खडे होतात ते त्यात साठलेल्या पित्तापासून बनतात. पित्ताचे खडे बनणे यामध्ये काही प्रकार दिसतात.

एकच मोठा खडा असतो जो पित्तामध्ये तरंगत असतो. औषधांनी उत्तम काम होते. छोटे छोटे काही खडे तरंगत असतात. औषधांनी उत्तम काम होते. छोटे छोटे असंख्य खडेच फक्त पित्ताशयात असतात. पित्त फार कमी असते. यातही त्रास होत असेल तर इमर्जन्सी येऊ शकते अन्यथा औषधे उत्तम काम करतात. एक किंवा दोन खडे पित्ताशयात आतून भिंतीला चिकटून असतात. यात आकस्मिक वेदना झाली तर ऑपरेशनला पर्याय राहत नाही अन्यथा औषधांनी प्रयत्न करणे शक्य असते. एकच खडा किंवा अनेक खडे एकत्र येऊन एकच मोठा खडा तयार होतो, जो पित्ताशय व्यापून टाकतो. यात ऑपरेशनच लागते. औषधांनी काम होत नाही.

काही सोपे उपाय

 1.सकाळी उठल्यावर तीन ते चार चमचे एरंडेल, पाव चमचा काळी मिरी, लिंबू रस दोन चमचे एकत्र करून रिकाम्या पोटी पिणे. त्यावर कोमट पाणी चार घोट प्यावे. हा उपाय दर 15 दिवसांनी तीन दिवस सलग करावा. यानंतर एखादा जुलाब झाला तर उत्तम फायदा होतो.
2.लिंबू रस चार चमचे, मिरची रस 1 चमचा, दालचिनी पाव चमचा, पाणीपुरी मसाला पाव चमचा हे सर्व एकत्र करून त्यात कोमट पाणी एक ग्लास मिसळून जेवणासह घोट घोट प्यावे. याने पित्ताशयात पित्त जेवताना स्राव होण्याचे प्रमाणही वाढते. बारीक खडे पित्तासह छोटय़ा आतडय़ात येऊन पचनानंतर मळावाटे पडून जातात. पित्ताशय धुतले जाते.
3.वरील दोन्ही उपाय पोटाचे विकार, आम्लपित्त, अल्सरचे त्रास, ग्रहणी रोग, डायवर्टिक्यूलायटीस असे रोग असणाऱयांनी हा उपाय करू नये.
4.दिवसभर गरम किंवा कोमट पाणीच प्यायची सवय लावावी.
5.जेवणात काळी मिरी किंवा हिरवी मिरची लावून केलेले पातळ ताक घोट घोट प्यावे. सोबत सैंधव मीठ, धणे, पुदिना ही टाकावा.
6.एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे हे एक कप पाण्यात एक मिनिट उकळून गाळून गरम गरम प्यावे. रोज दोन ते तीन वेळ सलग करावे. याने पित्ताशय आणि मूत्राशय दोन्ही धुतले जाते.
7.मुळा आणि मुळय़ाच्या पानांची भाजी आठवडय़ातून दोन वेळ खावी.
8.कुळथाचे पिठले थंडीत आणि पावसाळय़ात घ्यावे. उन्हाळय़ात कुळथाचे कढणे प्यावे.
9.काटे माठ आणि लाल माठाच्या पानांचा रस 40 मिली, मुळय़ाच्या पानांचा रस 40 मिली घेऊन त्यात धणे एक चमचा, जिरे अर्धा चमचा, ओवा पाव चमचा, काळे मीठ अर्धा चमचा मिसळून सकाळी एक वेळ प्यावे.
10.पित्ताशयात होणारे खडे ही एक सवय आहे. ती सवय तोडावी म्हणजे वारंवार खडे होणे टाळता येते. त्यासाठी वरील पैकी शक्य उपाय एक ऋतू म्हणजे किमान दोन महिनेपर्यंत तरी सुरू ठेवावे. सोबत आपल्या वैद्यांकडून औषधेही सुरू ठेवावीत. शक्य ते सर्व उपाय करून पाहिले की, फायदा नक्की होताना दिसतो. सर्जरी,
ऑपरेशन हे अशा वेळी अंतिम उपाय समजावेत.

औषधांनी उत्तम काम व्हावे यासाठी पथ्य आणि काही अतिरिक्त उपाय पुढीलप्रमाणे…
पथ्य (काय खावे)- दुधी, पडवळ, गिलके, तोंडली, पालक, माठ, तांदुळजा, चाकवत, (मिरची, ओवा, जिरे सैंधव लावलेले) पातळ ताक, दूध-भात, दूध-ज्वारीची भाकरी, जिरे, ताक-भात, हिरवी मिरची, काळी मिरी, कढीपत्ता, लसूण, आले, हळद.

अपथ्य (काय खाणे टाळावे)- केळी, सीताफळ, नवीन गूळ, नवीन धान्य प्रकार (सर्व धान्य प्रकार एक वर्ष जुने वापरणे चांगले), मटण, तळलेले शाकाहारी (चकली, समोसा, वडा, भजी, पापड, पुरी, भटुरे,) आणि मांसाहारी सर्व पदार्थ, मशरूम, दही, लस्सी, मिल्कशेक, आईस्क्रीम, फ्रूट सॅलेड, रताळी, अळूचे कंद, साबुदाणा, बटाटे, पनीर, मोड आलेली कडधान्ये, मैदा, पाव, क्रीम केक, क्रीम बिस्कीट, खारी बिस्कीट, टोस्ट-बटर, गहू, बाजरी, थंड पाणी इत्यादी.
वैद्य सत्यव्रत नानल
[email protected]