
सामना प्रतिनिधी । लातूर
अहमदपूर शहरातील विठ्ठल रुक्मीणी मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या बालाजी बने यास पोलिसांनी पकडले आहे. त्याच्याकडून ४०३० रुपये आणि एक चोरी करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आलेली आहे. इतरही कांही चोरीच्या घटना त्याच्या कडून उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अहमदपूर येथील लेक्चर कॉलनी मधील विठ्ठल रुक्मीणी मंदिरातील दानपेटी २० नोव्हेंबर २०१८ रोजी फोडण्यात आलेली होती. सुमारे २० हजार रुपयांची चोरी झाल्याची फिर्याद गजानन राजाराम लाठकर यांनी पोलीस ठाण्यात दिलेली होती. सदर चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आलेले होते. बालाजी तुकाराम बने रा. गायकवाड कॉलनी, अहमदपूर याने आपल्या साथीदारासह हा गुन्हा केला होता. त्याला पोलीसांनी पकडले आहे, त्याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे. त्याच्याकडून ४०३० रुपये रोख आणि चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास अहमदपूर पोलीस करीत आहेत.
































































