
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रभात टॉकीज मैदानात टाकून दिलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने एक दोन नाही तर तब्बल १३ गायींचा दुर्दैवी अंत झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय सोबत ५-६ वराहही दगावले आहेत. हा सर्व प्रकार त्या परिसरात टाकलेल्या खाद्यपदार्थातून विषबाधेमुळे झाल्याची चर्चा परिसरात आहे. काही नागरिकांनी गाईंना वाचवण्याचा प्रयत्नही केला मात्र तो निष्फळ ठरला.
शहरातील नेहरू चौक परिसरात प्रभात टॉकीजजवळ असलेल्या बाजीप्रभूनगरात गाई आणि वराहांचा गुरुवारी सायंकाळी टाकून दिलेले पदार्थ खाल्ल्याने झालेल्या विषबाधेमुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. या सर्व प्रकरणानंतर बाजीप्रभू नगर, प्रभात टॉकीज मैदानातील मृत्यू झालेल्या गाईंची व्हिलेवाटही तितक्याच तत्परतेने लावण्यात आली. गाईंचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊनही नगर पालिका प्रशासनाने शहर पोलिस ठाण्यात साधी तक्रारही न करता त्या मृत गाईंचा अंत्यसंस्कार आटोपला. यामुळे गाईंचा मृत्यू नेमका कशाने झाला याचे कारण गुलदस्त्यात आहे, या सर्व प्रकाराला नेमके जवाबदार कोण अशी चर्चा नागरिकांतून होत आहे. यावर आता प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.































































