जेएसडब्ल्यू कंपनीतील ठेकेदाराला खंडणीसाठी धमकी ; दोघांना अटक

31

सामना प्रतिनिधी । पेण

पेण तालुक्यातील डोलवी येथे असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीत काम करणार्‍या ठेकेदाराकडे ३२ लाखांची खंडणी मागणार्‍या दोघांच्या मुसक्या आवळून वडखळ पोलिसांनी त्यांना गजाआड केले आहे.

ठेकेदार अमेय यशवंत प्रभू-तेंडुलकर रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथील रहीवासी आहेत. त्यांना जे. एस.डब्ल्यू. स्टील कंपनीमध्ये खडी स्क्रिनिंग करण्याचे काम मिळाले आहे. पेण येथे राहणारे यशवंत पाटील व जगदीश म्हात्रे यांनी सदर कंत्राटदाराला तू बाहेरील असून आमच्या परवानगी शिवाय येथे काम करायचे नाही. येथे आमच्या परवानगीशिवाय कोणीही काम करत नाही, तुझे कंत्राट रद्द करून तू आणलेल्या मशिनरी बाहेर काढ’ अशी देखील दमदाटी केली. जर तुला येथे काम करायचे असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देऊन ३२ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. याबाबत ठेकेदार अमेय प्रभू– तेंडुलकर यांनी वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वडखळ पोलिसांनी तातडीने कारवाई करून खंडणी मागणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या