
सामना प्रतिनिधी, सांगोला
तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी सांगोल्यातून निघालेल्या भाविकांची स्विफ्ट कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला; तर दोघे गंभीर जखमी झाले. आज सकाळी चेन्नई-तिरुपती हायवेवर बत्तमपल्ली येथे हा अपघात झाला.
दादासाहेब यशवंत लांडगे (वय 45, रा. माळवाडी, सांगोला), प्रमोद सुनील राऊत (वय 23, रा. कडलास), गजानन राजाराम पाटील (वय 25, रा. लोणविरे) असे अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. तर, मारुती बबन गवळी (वय 19, रा. कडलास) व राजू मधुकर वेदपाठक (रा. वाटंबरे, ता. सांगोला) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
सांगोला येथील दादासाहेब लांडगे, प्रमोद राऊत, गजानन पाटील, मारुती गवळी व राजू वेदपाठक असे पाच मित्र लांडगे यांच्या स्विफ्ट कारमधून रविवारी दुपारी सांगोल्यातून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघाले होते. रात्रभर प्रवास करून त्यांची कार चेन्नई-तिरुपती हायवेवरून जात असताना अनंतपुरमपासून 40 कि.मी. अंतरावर बत्तलपल्ली गावाजवळ आंध्र प्रदेश परिवहनच्या बसशी त्यांची समोरासमोर धडक झाली. कार बसच्या डाव्या बाजूला घुसल्यामुळे कारमधील दादासाहेब लांडगे व प्रमोद राऊत हे दोघे जागीच ठार झाले; तर गजानन पाटील यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक व्ही. रामप्रसाद व पोलीस कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ उपचारांकरिता बत्तलपल्ली व अनंतपुरम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमी मारुती गवळी याच्यावर बत्तलपल्ली येथे, तर राजू वेदपाठक यांच्यावर अनंतपुरम येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच जखमी व मृतांचे नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले आहेत. दादासाहेब लांडगे हे हार-फुले विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे. तर, प्रमोद राऊत याचा मायाक्का माउली कॉम्प्लेक्समध्ये टेलरिंग मटेरियल विक्रीचा व्यवसाय आहे. गजानन पाटील हा मायाक्का माउली कॉम्प्लेक्समधीलच महालक्ष्मी मॉलमध्ये कामगार होता. मारुती गवळी याचा सांगोला स्टेशन रोडवरील जुन्या रेल्वे गेटजवळ सलूनचा व्यवसाय आहे; तर राजू वेदपाठक यांचे वाटंबरे येथे सराफी दुकान आहे.
























































