बंगालमध्ये ‘भगवं’ वादळ, तीन आमदार व 60 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या यशानंतर पश्चिम बंगालमध्ये भगवं वादळ वेगाने घोंगावत आहे. मंगळवारी पश्चिम बंगालचा सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या तीन आमदारांसह तब्बल 50 ते 60 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुकुल रॉय यांचा मुलगा शुभ्रांशू रॉय आणि तृणमूलचे आमदार शिलभद्र दत्त आणि सुनील सिंह यांनी नवी दिल्लीमध्ये आयोजीत एका कार्यक्रमामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांनी भाजपचे कमळ हाती घेतला. यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना तगडा झटका बसला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने पश्चिम बंगालमध्ये मोठे यश मिळवले. भाजपने पहिल्यांदाच येथे 18 खासदार निवडून आणले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही बंगालमध्ये भाजपची घोडदौड सुरूच आहे. मंगळवारी नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमामध्ये तीन आमदार आणि राज्यातील विविध भागातील जवळपास 50 ते 60 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यातील सर्वाधिक 24 नगरसेवक हे कंचरापारा, हलिशहर आणि नैहाती महानगरपालिकेचे आहेत.

भाजपमध्ये प्रवेश केलेले तृणमूल काँग्रेसचे आमदार शुभ्रांशू रॉय यांना पक्षाने काही दिवसांपूर्वी सहा वर्षासाठी निलंबित केले होते. पक्षाची प्रतिमा खराब केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. शुभ्रांशू रॉय हे एकेकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे जवळचे असणारे मुकूल रॉय यांचे सुपुत्र आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुकूल रॉय यांनी तृणमूलचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.