एटीएसला तपासासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडाचा तपास पूर्ण करण्यासाठी उच्च न्यायालयाने मंगळवारी दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) आणखी तीन महिन्यांची मुदत दिली. तपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सांगत एटीएसने तपासाचा प्रगत अहवाल सादर केला. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने एटीएसची तपासासाठी मुदतवाढ देण्याची विनंती मान्य केली.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या होऊन आठ वर्षे उलटली. मात्र तपास यंत्रणा सुस्त राहिल्याने हत्याकांडामागील मुख्य आरोपीचा थांगपत्ता लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत गोविंद पानसरे यांच्या सून स्मिता पानसरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी एटीएसने तपासाचा प्रगत अहवाल सादर करतानाच तपास पूर्ण करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदत मागितली. तपास यंत्रणेची ही विनंती मान्य करीत खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी तोपर्यंत पुढे ढकलली.

– कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सुरुवातीला एसआयटीमार्फत तपास सुरू होता. मात्र एसआयटी तपासात समाधानकारक प्रगती न दिसल्यामुळे उच्च न्यायालयाने तपास एटीएसकडे वर्ग केला होता.
– कोल्हापूरमध्ये 16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉम्रेड पानसरे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात गंभीर जखमी झालेल्या पानसरे यांचा चार दिवसांनंतर 20 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला.
– कॉ. पानसरे यांच्यासह अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, विचारवंत एम.एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटाचे सूत्रधार एकच असल्याचा दावा करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येचा अधिक तपास सुरू आहे.