नोकरीच्या नावाखाली करायचा फसवणूक, ठगाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेत नोकरी लावतो असे सांगून फसवणूक करणाऱया ठगाला कफ परेड पोलिसांनी अटक केली. गणेश सुरेश आसगावकर असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीच्या पैशातून तो मौजमजा करत असायचा.

तक्रारदार या गृहिणी असून त्या कफ परेड येथे राहतात. काही दिवसांपूर्वी तक्रारदार या पतीसोबत घाटकोपर येथे नोकरीच्या शोधात गेल्या होत्या. तेथील काम आटोपल्यानंतर त्या घाटकोपर येथील एका पोस्टात गेल्या. तेव्हा गणेश हादेखील तेथे उपस्थित होता. त्याने तक्रारदार याच्या पतीला पोस्टाचा फॉर्म भरण्यास मदत करतो असे सांगून बोलण्यास सुरुवात केली. गणेशने आपण रेल्वेत लोको पायलट असल्याच्या भूलथापा मारल्या. विश्वास बसावा म्हणून रेल्वेचे ओळखपत्र तक्रारदार यांना दाखवले. आपली रेल्वेत ओळख असून नोकरी लावतो असे तक्रारदार यांना सांगितले.

त्यानंतर गणेशने तक्रारदार यांचा नंबर घेतला. वरिष्ठ अधिकाऱयासोबत नोकरीबाबत बोलणे झाले असल्याचे भासवून तक्रारदार यांच्याकडून विविध कारणे सांगून 85 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर गणेशने तक्रारदार यांना बनावट नियुक्तीपत्र दिले. त्यानंतर तो तक्रारदार यांचे फोन उचलत नव्हता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार याने कफ परेड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून वरिष्ठ निरीक्षक संदेश रेवले यांच्या पथकाने तपास सुरू केला. गणेशला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.