अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला; कपडे फाडले, दगड-अंडी फेकली; हेल्मेट घालून वाचवला जीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या सोनारपूरमध्ये टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला आहे. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारातील पीडितांची भेट घेण्यासाठी पोहोचलेल्या अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अंडी फेकली आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती चिघळल्याचे पाहताच सुरक्षारक्षकांनी तत्परता दाखवली. अभिषेक बॅनर्जी यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीने हेल्मेट घालण्यात आले आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत तेथून बाहेर काढण्यात आले. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना सोनारपूरच्या कमराबाद परिसरात घडली. टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी शनिवारी संध्याकाळी आपल्या पक्षाच्या एका मृत कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले होते. ठरलेल्या वेळेनुसार ते साडेचारच्या सुमारास कमराबादला पोहोचले, जिथे भाजपचे कार्यकर्ते आणि नेते आधीपासूनच उपस्थित होते. या आंदोलनात महिलांना पुढे करण्यात आले होते आणि त्यांच्या हातात कच्ची अंडी होती.

तीव्र विरोध पाहता अभिषेक बॅनर्जी आपली कार सोडून दुचाकीवरून परिसरात जाऊ लागले. मात्र तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना पीडित कुटुंबाच्या घरापासून काही शंभर मीटर अंतरावरच रोखले. या घटनेवर बोलताना अभिषेक बॅनर्जी यांनी म्हणाले की, “या लोकांना मला मारायचे होते. माझा शर्ट फाडला. घटनास्थळी एकही पोलीस उपस्थित नव्हता. हेल्मेटमुळे माझे डोके वाचले. अशा हल्ल्यांना आम्ही अजिबात घाबरणार नाही.”