ठाण्यात टीएमटीची डबल डेकर धावणार, सोमवारचा मुहूर्त उन्हाळ्यात प्रवाशांचा कूल प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डबल डेकर बसमधून प्रवास करण्याचे ठाणेकरांचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. ठाण्यात सोमवारपासून टीएमटीची वातानुकूलित डबल डेकर बस धावणार आहे. परिवहनच्या ताफ्यात या बसची एण्ट्री होणार असून तांत्रिक टीमकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दहा डबल डेकर बस ठाण्यात दाखल होणार असून ऐन उन्हाळ्यात घामाघूम झालेल्या ठाणेकरांना आता डबल डेकरमधून ठंडा ठंडा कूल कूल प्रवास करता येणार आहे.

ठाणे शहराची वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता मुंबईच्या धर्तीवर ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वातानुकूलित डबल डेकर बसेसची मागणी करण्यात आली होती. दरम्यान मुंबईप्रमाणे ठाणेकरांनादेखील डबल डेकर बसचा आनंद घेता यावा यासाठी दोन वर्षांपूर्वी १० डबल डेकर बसचा प्रस्ताव परिवहन प्रशासनाने तयार केला होता. या बसचे प्रस्तावित मार्ग कोणते असतील याचादेखील अभ्यास आता जवळजवळ झाला आहे. सध्या इलेक्ट्रिक बसमुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होत आहे. त्यानंतर परिवहन सेवेच्या माध्यमातून डबल डेकर बसचे स्वप्नही परिवहन प्रशासनाच्या माध्यमातून दाखवण्यात आले होते. डबल डेकर बसचा उल्लेख अर्थसंकल्पातदेखील करण्यात आला होता.

सध्या परिवहनच्या ताफ्यात सामील होण्यासाठी एक बस सज्ज झाली असून तिची तांत्रिक तपासणी येत्या सोमवारी करण्यात येणार आहे. या बसची यशस्वी चाचणी झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत १० बसेस ठाण्याच्या रस्त्यावर धावतील, अशी माहिती परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
हे आहेत मार्ग तीन हात नाका ते थेट घोडबंदर गायमुख हा पहिला मार्ग, दुसरा मार्ग शिळफाटा दत्त मंदिर ते डोंबिवल ीचा एण्ट्री पॉईंट आणि तिसरा मार्ग पारसिकनगर-मुंब्रा वळण रस्ता ते कळवा शिवाजीनगर हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या तीनही मार्गात डबल डेकर बसला कुठेही अडथळा येणार नाही.