तंबाखूजन्य हुक्का बनविणारा कारखाना उद्ध्वस्त, आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तंबाखूजन्य हुक्का बनवून त्याचा साठा करणाऱया कारखान्यावर आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेने धडक कारवाई केली. पोलिसांनी माझगाव येथील त्या कारखान्यावर छापा टाकून आरोग्यास हानीकारक असलेला साडेसतरा लाखांचा तंबाखूजन्य हुक्काचा साठा जप्त केला.

माझगाव दारूखाना येथे एका कारखान्यात वेगवेगळ्या फ्लेव्हरचे तंबाखूजन्य हुक्का बनवले जात असून त्याचा साठा करून मग शहरात विविध हुक्का पार्लरमध्ये विकले जात असल्याची खबर आर्थिक गुन्हे नियंत्रण कक्षाचे प्रभारी निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. त्यानुसार पाटील यांनी पोलीस निरीक्षक किशोर पवार, एपीआय माया पाटील, चंद्रकांत वलेकर, महेश कोळी, विशाल यादव, रोहन शेंडगे, दरेकर, हिना राऊत, संगीता गिरी आदी पथकांसह त्या कारखान्यावर धडक दिली.

त्यावेळी तेथे 17 लाख 50 हजार रुपये किमतीचा आरोग्यास हानीकारक असलेला तंबाखूजन्य हुक्काचा साठा मिळून आला. अशा प्रकारे तंबाखूजन्य हुक्का बनवून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱया मुस्तफा फक्रुद्दीन चितलवाला (41) याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. आरोपी आणि जप्त केलेल्या हुक्क्याचा साठा पुढील कारवाईसाठी शिवडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.