
अल्पवयीन मुलीच्या गालाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याच्या प्रकरणात एका व्यक्तीला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय अल्पवयीन मुलीच्या गालाला स्पर्श करणे हे लैंगिक अत्याचाराच्या व्याख्येत येत नाही असेही हायकोर्टाने या वेळी नमूद केले आहे. जुलै 2020 पासून या प्रकरणात आरोपीला कोठडीत ठेवण्यात आले होते. न्यायमूर्ती के. शिंदे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
‘माझ्या मते पोक्सो कायद्यातील कलम 7 अंतर्गत कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय गालाला हात लावणे हा लैंगिक अत्याचार नाही,’ असे या वेळी न्यायमूर्ती के. शिंदे यांनी सांगितले. संबंधित 46 वर्षीय व्यक्तीवर आठ वर्षांच्या मुलीच्या गालांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप होता. मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोक्सोमधील कलम 7 अंतर्गत कोणीही लैंगिक हेतूने अल्पवयीन मुलगा किंवा मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श केले किंवा अल्पवयीनाला आपल्या गुप्तांगाला स्पर्श करण्यास भाग पाडले किंवा लैंगिक हेतूने शारीरिक संपर्क होईल अशी कोणतीही गोष्ट केल्यास तो लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आहे. कोर्टाने सुनावणीदरम्यान, ‘हाती आलेल्या पुराव्यांनुसार प्राथमिकदृष्टय़ा आरोपीने कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय पीडित मुलीच्या गालाला स्पर्श केल्याचे दिसत आहे,’ असे सांगितले. आरोपीच्या वकिलांनी व्यवसायातील शत्रुत्वामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला. तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल झाल्याचेही या वेळी त्यांनी सांगितले, दरम्यान कोर्टाने जामीन देताना मांडण्यात आलेल्या मतांचा दुसऱया प्रकरणांच्या खटल्यांवर वापर होऊ नये असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
























































