मोठी रेल्वे दुर्घटना टळली, रुळावरून घसरलेली बोगी फरफटत गेली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पानिपत

हरयाणातील पानिपत येथे मात्र बुधवारी सकाळी मोठी रेल्वे दुर्घटना टळली आहे. दिल्लीहून कालकाला जाणारी हिमालय क्विन पॅसेंजर गाडी भोडवाल माजरी स्थानकात पोहोचत असतानाच एक बोगी अचानक रुळावरून घसरली व 200 मीटर पर्यंत पुढे फरफटत गेल्याची घटना घडली आहे. याबद्दल माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने यात कुठलीही हानी झालेली नाही.

नेहमीप्रमाणेच बुधवारी सकाळीही हिमालय क्विन पॅसेंजर ही गाडी दिल्लीहून कालकाला जाण्यासाठी निघाली होती. सध्या होळीची धूम असल्याने गाडीत प्रवाशांची संख्याही अधिक होती. सकाळची वेळ असल्याने प्रवासी झोपेत होते. त्याचवेळी अचानक एक बोगी रुळावरून घसरत पुढे फरफटत जाऊ लागली. यामुळे अनेक प्रवासी सीटवरून खाली पडले. त्याचवेळी मोठा आवाज झाल्याने बोगीत एकच गोंधळ उडाला. तब्बल 200 मीटर बोगी रुळावरून पुढे फरफटत गेली. दरम्यान ही घटना घडली तेव्हा रेल्वे रुळाचे फाटक बंद होते. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. पण वेळीच रेल्वे अधिकारी व पोलिसांनी धाव घेत बोगीतून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यातही केरळमधील शोरानुपर येथे चैन्नई- मंगळुरू सुपरफास्ट गाडीचे दोन डब्बे रुळावरून घसरले होते. सुदैवाने त्यात कुटलीही हानी झाली नव्हती. पण तेव्हापासून त्या मार्गावरील रेल्वे फाटक बंद ठेवण्यात आले आहे.