लोकलच्या रोजच्या प्रवाशांमध्ये वाढ होतेय; महिनाभरात सात लाख 54 हजार पास विकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लसीकरण पूर्ण झालेल्या सर्वसामान्यांना लोकलची दारे खुली होऊन जवळपास महिना पूर्ण होत आला असून मध्य रेल्वेवर 12 सप्टेंबरपर्यंत 5 लाख 58 हजार 624 रेल्वे पासची विक्री झाली आहे, तर पश्चिम रेल्वेवर याच काळात 1 लाख 95 हजार 397 पासची विक्री झाली आहे. दोन्ही रेल्वे मिळून 11 ऑगस्टपासून 12 सप्टेंबर 2021 पर्यंत एपूण 7 लाख 54 इतके रेल्वे पास विकले गेले आहेत. तर रोजच्या प्रवाशांच्या संख्येत मात्र हळूहळू वाढ होत आहे.

लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस झालेल्या सामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ होईल असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात लोकलच्या रोजच्या प्रवासी संख्येत हळूहळू वाढ होत आहे. मध्य रेल्वेची रोजची प्रवासी संख्या आता सुमारे 20 ते 22 लाख झाली आहे, तर पश्चिम रेल्वेवर 11 ते 12 लाख प्रवाशांची संख्या इतकी झाली आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची भर पडूनही एपूण प्रवासी संख्या अद्याप 33 ते 34 लाखांपर्यंतच पोहचली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या जरी 19 लाख असल्याचे सांगितले जात होते तरी त्यामध्ये बहुतांशी ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे लोकलचे प्रवासी वाढले नसल्याचे म्हटले जात आहे. आता हळूहळू लोकलच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे.