
जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या आदेशाची प्रत गुरुवारी (दि. 16) जिल्हा पोलीस दलाला प्राप्त झाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची जळगाव येथे बदली झाली आहे. पोलीस नियंत्रण कक्षात असलेले बाजीराव पोवार यांची धुळे येथे, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले दौलत जाधव यांची नाशिक ग्रामीणला, तर संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सुनील पाटील यांची नाशिक ग्रामीणला बदली झाली आहे. नाशिक परिक्षेत्रातील एकूण 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी केल्या आहेत. बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांना शिवजयंतीच्या बंदोबस्तानंतर तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची नगर जिल्ह्यातील कारकीर्द चांगलीच गाजली आहे. अनेक प्रलंबित असलेल्या क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा कटके व त्यांच्या टीमने लावलेला आहे. विशेष म्हणजे गेल्या 2-3 वर्षांत जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर गावठी कट्टे पकडण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. याशिवाय गंभीर गुन्हा दाखल असलेले व वर्षानुवर्षे फरार असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडण्यात कटके यांचे मोठे योगदान आहे. याशिवाय नगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरील छापेमारी तसेच विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे लावला आहे.


























































