शिक्रापुरात भर बाजारात झाड कोसळून एक ठार, दोन जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिक्रापूर ता. शिरूर येथे दररोज भरल्या जाणाऱ्या भाजीपाला बाजारात सुमारे शंभर वर्षांचे झाड कोसळले असून यामध्ये भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला आहे. या अपघात दोन जण गंभीर जखमी झाले असून एका वाहनासह हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पुणे नगर रस्त्यालगत असलेल्या जुन्या पुलाजवळ खासगी जागेत दररोज भला मोठा भाजीपाला बाजार भरतो. या बाजाराजवळच जुने पिंपरण अर्थात नांदरुक नावाचे झाड आहे. गुरूवारी चार वाजण्याच्या सुमारास येथील हे भले मोठे झाड येथील बाजारात कोसळले. येथील व्यापारी व नागरिकांची पळापळ झाली. मात्र या धावपळीत भाजी विक्रेते फुलसिंग कनीराम चव्हाण रा. शिक्रापूर, जि. पुणे मूळ रा. हुंडी ता. पुसद जि. यवतमाळ यांचा मृत्यू झाला आहे तर सोनाली संतोष सासवडे वय ३५ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे तसेच रामकृष्ण खरडकर वय ६५ वर्षे रा. करंजेनगर शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे हे दोघे जखमी झाले आहेत. या झाडाखाली मधुकर भुजबळ यांचे एम एच १२ एफ डी ०६५७ क्रमांकाचे पिक अप वाहन चिरडून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे, संदीप जगदाळे, राजेंद्र पवार, अमित देशमुख, महिला पोलीस नंदा घोडके, नम्रता सकट यांसह विद्युत्र वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन महाजन, शाखा अभियंता अभिजित बिरनाळे, शिक्रापूरचे सरपंच जयश्री भुजबळ, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, उत्तम गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी झाडा खाली अडकलेल्या व्यक्तींना मंगेश विरोळे, सचिन करंजे, तुषार आळंदीकर, मंगेश चव्हाण, ऋषिकेश करंजे, आमीर शेख यांसह आदींच्या मदतीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर काही वेळाने दोन क्रेनच्या मदतीने येथील झाड बाजूला करण्यात आले परंतु यामध्ये व्यापाऱ्यांच्या भाजीपाला मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शाळा सुटली असती तर मोठा अनर्थ घडला असता
शिक्रापूर ता. शिरूर येथे खाजगी जागेत भरल्या जाणाऱ्या बाजाराशेजारी शाळा असून या बाजारात दररोज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर नागरिकांची व ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. झाड चार वाजण्याच्या सुमारास कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळला गेला. हे झाड पाच नंतर पडले असते तर येथे मोठ्या प्रमाणात ग्राहक तसेच नागरीक व शाळकरी मुले उपस्थित असतात त्यामुळे मोठा अनर्थ या ठिकाणी घडला असता.

ग्रामपंचायतीचे बाजार हटविण्यात दुर्लक्ष
शिक्रापूर येथे दररोज भरत असलेला भाजीपाला बाजार रस्त्याचे कडेला भरला जात असल्यामुळे तसेच येथे शाळा असल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन शालेय मुलांना देखील जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्यामुळे येथील बाजार हटविण्याची मागणी येथील नागरिकांनी ग्रामपंचातीकडे लेखी स्वरुपात केली होती परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून आज घडलेल्या घटनेमुळे एका इसमाला जीव गमवावा लागला आहे.