कल्याणमधील झाडांवर विषप्रयोग, वृक्षप्रेमींमध्ये संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याणमधील गणपती चौक ते डीपी चौक या रस्त्यालगतच्या निसर्गसौंदर्यात भर घालणाऱ्या टेबेबुईया झाडांना विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तींनी झाडांच्या खोडांना ड्रिल मशीनने छिद्रे पाडून त्यामध्ये विषारी द्रव्य सोडल्याचा संशय आहे. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

बुधवारी सकाळच्या सुमारास परिसरातील काही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी गेले असता रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या टेबेबुईया झाडांच्या खोडांवर संशयास्पद छिद्रे दिसून आली. नागरिकांनी जवळ जाऊन पाहणी केली असता या छिद्रांमध्ये इंजेक्शनद्वारे विषारी द्रव्य टाकण्यात आल्याचे समजले. तसेच झाडांच्या सालीमधून पांढऱ्या रंगाचा द्रव बाहेर येत असल्याचेही निदर्शनास आले. काही झाडांची पाने पिवळी पडून गळाली होती. या प्रकाराची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने केडीएमसीच्या उद्यान विभागाशी संपर्क साधला. झाडांची हत्या करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.