ट्रम्प यांनी पराभवाचा राग काढला, अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्याला तडकाफडकी हटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणुकीतील पराभवानंतरची खदखद बाहेर पडली आहे. त्यांनी सोमवारी मार्क एस्पर यांना तडकाफडकी देशाच्या संरक्षण मंत्रीपदावरून हटवले, तर क्रिस्टोफर मिलर यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची तात्पुरती जबाबदारी सोपवली. ट्रम्प यांनी सोमवारी यासंदर्भात ट्विट केले. त्यात त्यांनी एस्पर यांच्या हकालपट्टीची घोषणा करतानाच मिलर यांच्यावर विश्वास व्यक्त केला.

ट्रम्प आणि एस्पर यांच्यात अनेक दिवसांपासून मतभेद होते. ट्रम्प निवडणूक जिंकले असते तर एस्पर हे स्वतःच राजीनामा देणार होते. अखेर ट्रम्प यांनी पराभवाचा राग काढत एस्पर यांना संरक्षण मंत्री पदावरून काढून टाकले. ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले की, मला ही घोषणा करताना आनंद होतोय की राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राचे उच्च सन्मानित संचालक क्रिस्तोफर मिलर यांना देशाचे हंगामी संरक्षण मंत्री बनवले जात आहे. क्रिस्तोफर चांगले काम करतील. मार्क एस्पर यांना पदावरून हटवले जात आहे. त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांना धन्यवाद.’ जूनमध्ये लाफेट पार्पमध्ये आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुर आणि पोलिस बळाचा वापर करण्यात आला होता. त्या घटनेवेळी एस्पर यांनी ट्रम्प यांच्याशी अंतर ठेवले होते. पुढे दोघांमधील मतभेद वारंवार चव्हाटय़ावर येत गेले.