
सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर
बनावट विवाह करून तरूणांना फसविणार्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता त्यांच्याकडून फसले गेलेले राज्यभरातून बारा तरूण शहर पोलीसांकडे कैफियत घेऊन आले असून त्यांच्याकडून या टोळीने लाखो रूपये उकळले आहेत. यासारख्या आणखी काही टोळ्या शहरात कार्यरत असल्याचे तपासात पुढे येत आहेत. त्यादृष्टीने आता तपास सुरू आहे.
आणखी फसवणूक झालेल्या तरूणांमध्ये सुनील खंडू शिंदे (रा. पुणतांबे, राहाता), राजू गंगाराम मोहिते (रा. बापतरा नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), कृष्णा विठ्ठल जाधव (रा. चाळीसगाव) व गैतम अशोक वाव्हळ (रा. जळगाव), साहेबराव माळी (चाळीसगाव), गणेश माळी (खेडगाव, चाळीसगाव), कैलास महाजन (खेडगाव, चाळीसगाव), सुखलाल महाजन (दसके बर्डी, चाळीसगाव) या तरुणांचा समावेश आहे.
किशोर एकनाथ पगार (रा. पांगरी, ता. सिन्नर) या तरुणाकडून ५० हजार रुपये घेऊन त्याच्याबरोबर एका तरुणीचा विवाह लावण्यात आला. तीन दिवसानंतर बनावट नवरी व कलवरी झालेली तीची आई यांनी पलायन केले. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दखल घेतल्याने या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात जाकीर उर्फ बाळासाहेब बबन पठारे, नवरी प्रियंका प्रकाश रोकडे, आई अनिता प्रकाश रोकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तिघांसह आणखी एक महिला कुंदा कैलास शिंदे यांना अटक झाली. या रॅकेटने अनेकांना लुबाडले असल्याचे पुढे आले आहे.
मुख्य सुत्रधार बाळासाहेब पठारे हा जाकीर तसेच जॅकी ही टोपण नावे वापरत असून पोलीसांच्या तपासात सहा लग्न लावल्याची कबुली त्याने दिली होती. प्रत्येकाकडून पन्नास हजार ते एक लाख रुपये त्याने घेतले. त्यापैकी तीन तरुणी नवर्याबरोबर नांदत आहेत. तर तिघी नांदत नसल्याचे त्याचे म्हणणे होते. प्रत्यक्षात मात्र फसवणूक झालेले बारा जण पोलीसांपुढे हजर झाले. त्यांच्याकडून प्रत्येकी ५० हजार ते १ लाखापर्यंत रूपये घेऊन विवाह लावण्यात आले. विवाहानंतर काही दिवसातच नवरीने दागिन्यांसह पलायन केले, असे या तरुणांनी पोलीसांना सांगितले. विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये आणखी काही महिला असून त्यांची नावे बनावट आहेत.
फसवणूक झालेले चार तरुण आज पोलीसांसमोर आले. त्यांनी फसवणुकीच्या प्रकाराचे किस्से सांगितल्यानंतर पोलीस थक्क झाले. एकूण बारा तरुणांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून त्यातील काही जण आज न्यायालयात हजर झाले. त्यांना या खटल्यात साक्षीदार केले जाणार असून ज्या ठिकाणी विवाह लावण्यात आले तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. यातून रॅकेटची व्याप्ती राज्यभर असल्याचे पुढे आले आहे. पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संपत शिंदे अधिक तपास करीत आहेत.
तरूणी एक नावे अनेक
आरोपी प्रियंका हिने कविता जगताप, हिराबाई हतांगळे, मनिषा पठारे, कविता गायकवाड, प्रियंका शिंदे, कविता डमाळे, वंदना शिंदे, अर्चना कांबळे आदी नावांचा वापर करून तरूणांना गंडा घातला. शिवाय तिची आई अनिता हिने प्रत्येक वेळी वेगवगेळे नाते सांगून बनाव रचल्याचे आता तपासात निष्पन्न झाले आहे.



























































