राजभवनात 22 टनांच्या जुळ्या तोफा सापडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राजभवनात 22 टन वजनाच्या दोन ब्रिटिशकालीन तोफा सापडल्या असून शनिवारी दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या. या तोफा अनेक दशके दुर्लक्षित अवस्थेत मातीखाली दबून होत्या. या तोफांची लांबी 4.7 मीटर तर व्यास 1.15 मीटर इतका आहे.

या तोफांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन राज्यपालांनी नौदलाच्या तज्ञांची मदत घेऊन तोफांची तांत्रिक माहिती घेण्याचे तसेच तोफांचे जुने अभिलेख असल्यास तपासण्याची सूचना राजभवनच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

सन 2016 साली राज्यपालांच्या निवासस्थानाखाली सापडलेल्या भूमिगत बंकरच्या परिरक्षणाचे काम एका तज्ञ वास्तुविशारद फर्मच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून हे काम झाल्यानंतर त्या ठिकाणी संग्रहालय निर्माण करून बंकर जनतेसाठी खुले करण्याचे राज्यपालांनी यापूर्वीच सूचित केले आहे.

तोफा सर्वांना पाहता येणार
या जुळ्या तोफा राजभवनातील जल विहार (बँक्वे हॉल) हॉलच्या समोर दर्शनी भागात ठेवण्याची देखील राज्यपालांनी सूचना केली आहे. त्यामुळे लोकांना तसेच इतिहासप्रेमींना या तोफा पाहता येणार आहेत.