
केंद्र सरकारविरोधातील वादात ट्विटरने हिंदुस्थानची अस्मिता दुखावण्याचा अतिरेक केला आहे. ट्विटरने आपल्या साइटवर हिंदुस्थानच्या नकाशातून जम्मू-कश्मीर आणि लडाखला अलिप्त केले आहे. नकाशात या दोन पेंद्रशासित प्रदेशांना वेगवेगळे देश म्हणून दाखवले आहे. सरकार ट्विटरला नोटीस बजावून कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, ट्विटरने रात्री उशिरा हा वादग्रस्त नकाशा हटवला.
ट्विटरने तीन दिवसांपूर्वी, शुक्रवारी केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान व कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांचे अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक केले होते. तसेच यापूर्वी टूलकिट प्रकरणात भाजप नेत्यांच्या ट्विट्सवर कारवाई केली होती. नंतर केंद्र सरकारने सोशल मीडियासंबंधी नवीन नियमावली जारी केली व त्यासाठी ट्विटरला अल्टिमेटम दिला. यातून केंद्र सरकार विरुद्ध ट्विटर असा संघर्ष चिघळला आहे. यादरम्यान ट्विटरने हिंदुस्थानच्या नकाशात फेरफारचा अतिरेक केल्याचे सोमवारी उघडकीस आले. देशाच्या नकाशातून जम्मू-कश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश वगळण्याची ट्विटरची कुरापत सर्वप्रथम एका युजरच्या निदर्शनास आली. त्याने ट्विटरवरील देशाचा फेरफार केलेला नकाशा सोमवारी सकाळी 10.38 वाजता शेअर केला. त्यानंतर वादग्रस्त नकाशाचा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. याचदरम्यान ट्विटरच्या अतिरेकी कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारने या प्रकारची गंभीर दखल घेऊन ट्विटरला नोटीस बजावली आहे.
याआधी लेहला चीनच्या नकाशात ठेवले होते!
ट्विटरने हिंदुस्थानच्या नकाशात फेरफार करण्याचे दुसऱयांदा धाडस केले आहे. याआधी ऑक्टोबर 2020 मध्ये लडाखमधील लेह क्षेत्र चीनच्या नकाशात नेऊन ठेवले होते. त्यावर सरकारने ट्विटरचे सीईओ जेक डोरसे यांना तंबी दिली होती. तसेच देशवासीयांतूनही तीव्र संताप व्यक्त झाला होता. त्यावेळी चुकीची माफी मागणाऱया ट्विटरने सात महिन्यांत दुसऱयांदा हिंदुस्थानच्या नकाशात फेरफारचा अतिरेक केला आहे.


























































