
ट्विटर युजर्ससाठी मोठी बातमी असून गुरुवारी मध्यरात्रीपासून व्हेरिफाईड अकाऊंट्सवरून फ्री ब्ल्यू टिक्स काढून टाकण्यास सुरुवात झाली आहे. या सेवेसाठी ज्या वापरकर्त्यांनी पैसे मोजलेले नाही अशांच्या अकाऊंटवरून ब्ल्यू टिक काढण्यात आल्या आहेत. याचा फटका अनेक सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनाही बसला आहे.
ट्विटर विकत घेतल्यानंतर एलन मस्क यांनी ब्ल्यू टिकसाठी पैसे मोजावे लागणार असल्याची घोषणा केली होती. ज्या अकाऊंटधारकांनी पेड सबस्क्रिप्शन घेतलेले नाही त्यांच्या अकाऊंटवरून ब्ल्यू टिक काढणार असल्याचे जाहीर करत यासाठी युजर्सला 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत गुरुवारी मध्यरात्री संपली असून त्यानंतर ट्विटरने ब्ल्यू टिक काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक व्हेरिफाईट युजर्सच्या ब्ल्यू टिक आता बंद झाल्या आहेत.
टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहली, माजी कर्णधार एम. एस. धोनी, भारतरत्न सचिन तेंडुलकर, दिग्गज फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो, महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता सलमान खान, अभिनेता शाहरूख खान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींच्या व्हेरिफाईड ट्विटर अकाऊंटच्या ब्ल्यू टिक्स काढून काढण्यात आल्या आहेत.
खतम, टाटा बाय-बाय! ट्विटरने ब्ल्यू टिक केली बंद; विराट ते बिग बींपर्यंत दिग्गजांचा यादीत समावेश #TwitterBlue #TwitterBlueTick #ViratKohli #AmitabhBachchan #RahulGandhi #CristianoRonaldo pic.twitter.com/5iFkB9wxGz
— Saamana (@SaamanaOnline) April 21, 2023
इथून पुढे जर एखाद्या व्यक्तीला ब्ल्यू टिक हवी असेल तर त्यासाठी त्याला ट्विटरला पैसे द्यावे लागणार आहेत. ज्या व्यक्ती किंवा संस्था पैसे मोजतील फक्त त्यांनाच ट्विटर ब्ल्यू टिक देणार आहे. त्यासाठी ट्विटरवरून ब्ल्यू टिक सबस्क्राईब करावी लागेल.
ट्विटरने 2009 मध्ये ब्ल्यू टिक देण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला याद्वारे सेलिब्रिटींच्या अधिकृत अकाऊंटना ब्ल्यू टिक देण्यात आली होती. मात्र एलन मस्क ट्विटरचे मालक बनताच त्यांनी या सेवेसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. याचे शुल्क प्रत्येक देशानुसार वेगळे आहे. हिंदुस्थानमध्ये यासाठी मोबाईल वापरकर्त्यांना 900 रुपये महिना, तर वेब व्हर्जनसाठी 650 रुपये महिना आहे.

























































