ढोल ताशांचा गजर अन् शास्त्रींची बिअरवर नजर, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानने मेलबर्न कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या विजयानंतर टीम इंडियाने तुफान जल्लोष केला. विजयाच्या रंगात रंगलेले हिंदुस्थानचे प्रशिक्षक रवी शास्त्री चक्क बिअरची बाटली घेऊन बाहेर आले आणि कॅमेऱ्यात कैद झाले. शास्त्री यांचा झिंगाट फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

मेलबर्न कसोटी जिंकल्यानंतर हॉटेलकडे परताना रवी शास्त्री बिअर पिताना दिसून आले. हॉटेलकडे परतणाऱ्या बसमधून खेळाडूंसोबत शास्त्री उतरले. यावेळी टीम इंडियाचे ढोल-ताशांनी स्वागत करण्यात आले. याच दरम्यान शास्त्री बिअरची बाटली हातात घेऊन बसमधून उतरले. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले.

मेलबर्न कसोटीमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी पराभव करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. 9 बळी घेणाऱ्या बुमराहला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. मालिकेतील चौथा सामना सिडनीमध्ये 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे.