
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरला जोरदार धक्का दिला आहे. कंपनीला आपल्या प्लॅटफॉर्मवरील फेक अकाऊंट्सची माहिती गोळा करण्यात अपयश आल्याचा आरोप करत शुक्रवारी मस्क यांनी ट्विटर खरेदीची डील रद्द केली आहे. ही डील रद्द केल्यामुळे ट्विटरच्या शेअर्सममध्ये तब्बल सहा टक्क्यांची घसरण झाली.
एप्रिल महिन्यात मस्क यांनी तब्बल 44 अब्ज डॉलर म्हणजेच 3.37 लाख कोटी रुपयांना ट्विटर विकत घेण्याबाबतचा करार केला होता. ट्विटरवरील एकूण युजर्सपैकी फेक युजर्स पाच टक्क्यांहून कमी असतील तर आपण ही डील पूर्ण करू, अन्यथा ती रद्द करू असा इशाराच गेल्या महिन्यात मस्क यांनी कंपनीला दिला होता. मस्क यांचे वकील म्हणाले, आम्ही ट्विटरकडे त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील स्पॅम अकाऊंटची माहिती मागवली होती. त्याचे उत्तर आम्हाला मिळाले नाही. ट्विटरने कराराच्या अटींचे उल्लंघन करून चुकीची माहिती दिली. त्यामुळे आम्ही ही डील रद्द करण्याचा निर्णय घेतला.
ट्विटर ठोठावणार कोर्टाचे दार
दुसरीकडे, ट्विटर बोर्डाचे चेअरमन ब्रेट टायलो यांनी हा करार लागू करण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, ही डील रद्द करणे मस्क यांनाही महागात पडू शकते. ट्विटर आणि मस्क यांच्यातील करारानुसार सौदा रद्द झाल्यास मस्क यांना एक अब्ज डॉलर्सची ब्रेकअप शुल्क द्यावे लागेल. फी देऊनही सुटका होणार नाही.

























































