सैराटच्या हिंदी गाण्यावर प्रेक्षक वैतागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठीतील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सैराट’ चा हिंदीतील रिेमेक ‘धडक’चा ट्रेलर लाँच झाला आणि या दोन चित्रपटात प्रेक्षकांनी तुलना सुरु केली आहे. सैराटसाठी पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या रिंकू राजगुरूच्या अभिनयाच्या जवळपासही धडकमधील जान्हवी कपूरचा अभिनय पोहचत नसल्याची टीका त्यावेळी झाली. ‘धडक’ला सैराट इतकाच प्रतिसाद मिळेल का याबाबतही प्रेक्षक साशंक आहेत. सैराट चित्रपटातील झिंगाट हे गाणे जबरदस्त हिट झाले होते. आजही हे गाणे अनेकांच्या हिटलिस्टमध्ये आहेच. प्रेक्षकांची हीच नस पकडून करण जोहरने ‘धडक’मध्येही झिंगाट गाणे टाकले आहे. ओरिजन झिंगाटचे भाषांतर करून तयार केलेले हे गाणे ऐकून प्रेक्षक अधिकच वैतागले असून ‘भीक नको पण कुत्रा आवर’ असे म्हणायची वेळ प्रेक्षकांवर आली आहे. करण जोहरच्या झिंगाट गाण्याला सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने मराठीतील सैराट चित्रपटाचाा रिमेक तयार केला आहे. या चित्रपटातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर व शाहीद कपूरचा सावत्र भाऊ इशान खट्टर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. हा चित्रपट येत्या २० जुलैला रिलीज होणार आहे. सैराटची हुबेहुब नक्कल असलेला धडक प्रेक्षकांना किती आवडतो हे २० जुलै नंतरच कळेल मात्र सध्या तरी या चित्रपटावर प्रेक्षक खूष नसल्याचं दिसतंय.