जम्मू-कश्मीरमध्ये अल-बदरच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीनगर

जम्मू-कश्मीरच्या शोपियानमध्ये रविवारी पहाटे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांना अल-बदर या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर तेथून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे. सध्या या परिसरात नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू आहे.

रविवारी पहाटे शोपियान जिह्यातील जैनापुरा परिसरात ही चकमक झाली. या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे शोधमोहीम राबवण्यात आली होती. शोधमोहीम सुरू असतानाच दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबाराला सुरुवात झाली आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. शोपियान परिसरात अजून दहशतवादी लपल्याच्या शक्यतेमुळे शोधमोहीम सुरू आहे.

पुलवामात सीआरपीएफ शिबिरावर ग्रेनेडहल्ला: एक जवान शहीद
जम्मू -कश्मीरातील पंचायत समिती निवडणुकीत भरघोस मतदान झाल्याने दहशतवाद्यांचा तीळपापड झाला आहे. त्याच रागातून रविवारी सायंकाळी जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी पुलवामाच्या काकपोरा रेल्वेस्थानकानजीकच्या सीआरपीएफ शिबिरावर जोरदार ग्रेनेडहल्ला चढवला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक कॉन्स्टेबल शहीद झाला तर दोन जवान जखमी झाले. या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल चंद्रिका प्रसाद यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.