झारखंडमध्ये हत्तींचा धुमाकूळ; घर कोसळून दोन मुलांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । धनबाद

झारखंड राज्यातील धनबाद जिह्यातील दोमुंडा गावात हत्तीच्या कळपाने आज धुमाकूळ घातला. हत्तींनी घराच्या भिंती धडका देऊन पाडल्यामुळे एका कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाला असून त्यांची आजी भिंत कोसळून जखमी झाली आहे.

धनबादपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावरील दोमुंडा गावात अन्नाच्या शोधात हत्तींचा कळप घुसला. घरात भात साठवून ठेवले असल्यामुळे हत्तींनी मातीचे घर पाडले. पहाटे 3 वाजता लोक गाढ झोपेत असताना ही घटना घडली. या दुर्घटनेत विनोद मल्हार यांचा मुलगा संजित मल्हार (५) आमी किस्ते मल्हार यांची मुलगी चिंतामणी कुमारी (12) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची आजी कुमुदिनी देवी (५०) ही गंभीर जखमी झाली असून तिला पाटलीपुत्र मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दरम्यान, मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ हजार रुपये मदत देण्यात आली असून, कार्यालयीन औपचारिकता पूर्ण झाल्यावर त्यांना सरकारकडून ४ लाख रुपये भरपाई देण्यात येईल, असे थुंडी नवविभागाचे रक्षक शंभू प्रसाद गुप्ता यांनी सांगितले.