दिल्लीतून आणखी दोघा चिमुकल्यांची सुटका

57

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुलगा होत नाही अशा दांपत्यांना नवजात बालके विकणाऱया टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट-6 ने पर्दाफाश केल्यानंतर त्या टोळीने दिल्लीतील व्यावसायिकांना विकलेल्या आणखी दोघा चिमुकल्यांना ताब्यात घेतले आहे. ही बालके विकत घेणाऱया दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मानखुर्द, कल्याण परिसरात राहणाऱया काही महिला सरोगसीचे काम करतात. पोलीस निरीक्षक चंद्रकांत दळवी यांना ही माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ तपास करून पोलिसांनी नवजात बालकांची खरेदी-विक्री करणाऱया चार महिलांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दोघांना विकलेल्या दोन मुलांची सुटका केली होती. दरम्यान, कल्याणला राहणारी भाग्यश्री कोळी हिच्या चौकशीत आणखी एक माहिती समोर आली. भाग्यश्रीने दिल्लीतील पवन शर्मा या मध्यस्थाच्या माध्यमातून तेथील व्यावसायिक राहुल गुप्ता आणि अभिनव अग्रवाल यांना मुलांची विक्री केल्याचे समोर आले. हा प्रकार कळताच युनिट-6 च्या पथकाने दिल्ली गाठून गुप्ता आणि अग्रवाल यांच्याकडून दोन मुलांना ताब्यात घेतले. तसेच बेकायदेशीरपणे मुलांची खरेदी केल्याप्रकरणी पोलिसांनी राहुल आणि अभिनव यांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या