
ऑनलाइन घेतलेले कर्ज फेडलेले असतानाही दोघा गुन्हेगारांनी कर्जदारास त्यांचे मॉर्फिंग केलेले नग्न फोटो व्हायरल करून लुटले. धमकावून अधिकचे पैसे लाटल्यानंतरही गुन्हेगारांकडून त्रास देणे सुरूच होते. अखेर याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघा सायबर भामटय़ांचा गेम खल्लास झाला.
किरण (नाव बदललेले) यांनी दोन लाख 97 हजारांचे ऑनलाइन कर्ज घेतले होते. सदर कर्जाची प्रोसेसिंग फी व व्याज वजा होऊन त्यांना एकूण एक लाख 95,390 रुपये कर्जाची रक्कम मिळाली होती. त्यानंतर किरण यांनी कर्जाची परतफेड म्हणून पाच लाख तीन हजार इतकी रक्कम भरलेली होती. किरण यांनी कर्जाची परतफेड करूनही त्यांना एक अज्ञात व्यक्ती वारंवार कर्जाची रक्कम भरण्याकरिता संपर्क साधून पैसे न भरल्यास त्यांचा चेहरा असलेला नग्न फोटो त्यांच्या मित्रांना पाठविण्याची धमकी देत होता. किरण यांनी पैसे भरण्यास नकार दिल्याने अज्ञात भामटय़ाने त्यांचा चेहरा असलेला नग्न फोटो किरण यांच्या मित्रांना पाठवून त्यांची बदनामी केली. तसेच किरण यांनी घेतलेल्या कर्जाच्या रकमेपेक्षा दोन लाख 10 हजार इतकी रक्कम अधिक भरण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली होती. त्यामुळे याप्रकरणी किरण यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश पाटील तसेच संतोष पवार, नीलेश झगडे या पथकाने तपास सुरू केला.
पत्ता मध्य प्रदेशचा, सापडले कर्नाटकात
पथकाने गुन्हय़ात वापरण्यात आलेल्या मोबाईल फोनचा एसडीआर व सीडीआर प्राप्त करून त्याचे विश्लेषण केले असता त्यांना एसडीआरमधील पत्ता हा मध्य प्रदेश येथील व ‘पाहिजे’ आरोपीचे लोकेशन हे कर्नाटकातील बिजापूर येथील दिसून आले. तसेच ‘पाहिजे’ आरोपीने सदरचा गुन्हा करण्यासाठी वेगवेगळे 22 मोबाईल सिमकार्ड व फसवणूक केलेली रक्कम हस्तांतरित करण्यासाठी 17 बँक खात्यांचा वापर केला असल्याचे निदर्शनास आले. पोलीस पथक बिजापूरला रवाना झाले, पण आरोपी वेगवेगळे सिमकार्ड वापरत असल्याने त्यांना पकडणे कठीण बनले होते. तरीदेखील हार न मानता पथकाने चिकाटीने तपास करून मोहम्मद अली (21) आणि सलमान रियाज हदनूर (19) अशा दोघा सायबर भामटय़ांना पकडून आणले.






























































