
संततधार पावसामुळे मराठवाड्यात सर्वत्र पिकांची मोठी नासाडी झाली आहे. या अस्मानी संकटात कसे जगावे, अशा पेचात सापडलेल्या बीडच्या आष्टी तालुक्यातील पांढरी आणि नांदेड जिल्ह्याच्या नायगाव बाजार तालुक्यातील नरंगल या गावांतील दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आष्टी तालुक्यातील पांढरी येथील गळफास घेतलेले दादासाहेब बाबुराव वांढरे (56) यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे, मात्र अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा अधिकारी पंचनामा करत नाहीत. सरकारकडून मदतीचा छदामही मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे आलेल्या या संकटामुळे मशागतीसाठी आणलेली उसनवारी कशाने फेडायची, वर्षभर काय खायचे, पोरंबाळं कशी जगावायची या चिंतेत असलेल्या दादासाहेब वांढरे यांनी आज रविवारी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने बीड जिल्हा हादरला आहे.
दुसऱ्या घटनेत नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार तालुक्यातील नरंगल येथील युवा शेतकरी प्रदीप मुकुंद पट्टेकर (30) हे सततची नापिकी आणि महागाईमुळे त्रस्त होते. बँकेचे कर्ज, मुलांचे शिक्षण, कुटुंबाची जबाबदारी असलेल्या प्रदीपला यंदाही निसर्गाच्या अवकृपेमुळे दुबार पेरणी करावी लागली. उधार-उसनवारी करून दुबार पेरणी केलेले पीक कसेबसे तरले, पण परतीच्या पावसाने पीक वाया गेल्याने ते कमालीचे उदास झाले होते. तोंडावर आलेला दिवाळीचा सण, हातात पैसा नाही. हातातोंडाशी आलेले पीकही पावसामुळे हातचे गेल्याने तणावाखाली असलेल्या प्रदीप यांनी काल शनिवारी रात्री गळफास घेऊन आपले जीवन संपविले. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सरकारचा अजब फतवा..
ऑनलाईन फॉर्म भरा, नाहीतर जमीन पडिक म्हणून गृहित धरली जाईल, असा अजब फतवा इडी सरकारने काढला आहे. एकीकडे परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. रविवारीही बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर होता. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या, तर दुसरीकडे महसूल खात्याने जून-जुलैमध्ये पेरणी केलेल्या खरीप हंगामाचा पेरा एका अर्जावर ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे फर्मान काढले. जर हा पिकपेरा फॉर्म भरून न दिल्यास ती शेती पडिक असल्याचे गृहित धरले जाईल, असे म्हटले गेले. एकीकडे सर्व्हर डाऊन आहे. पावसाच्या सरी कोसळत आहेत. झालेल्या नुकसानीमध्ये शेतकरी चिंतेत आहेत. ही सगळे संकटे असूनही शेतकऱ्याला बांधावर जाऊन पीक पेयाचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावा लागत आहे.

























































