बिटकॉईन प्रकरणात आणखी दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय जोशी । नांदेड

नांदेडमधील अनेकांची बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून तब्बल १ कोटींची फसवणूक करणाऱ्या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. दिगंबरराव पांचाळ आणि राजू मोतेवार अशी त्या दोघांची नावे असून याप्रकरणात याआधी तीन जणांना अटक झालेली आहे.

दीड वर्षांपुर्वी नांदेड येथील प्रा. प्रशांत पाटील यांनी बिटकॉईन या आभासी चलनात गुंतवणुक करायला लावून त्यांची काही लोकांनी फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. त्यात अमोल थोंबाळे, अमित भारद्वाज, हेमंत सुर्यवंशी, दिगंबरराव पांचाळ, राजू मोतेवार यांनी संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल झाला. पुढे या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर इतरही काही जणांनी त्यांची अशाच प्रकारची फसवणूक झाल्याची माहिती पोलिसांना दिली. बिटकॉईन या आभासी चलनाचा दर एक बिटकॉईनसाठी १४ लाख रुपये होता. त्यानंतर हा दर घसरून ७ लाख रूपये झाल्यावर गुंतवणूकदारांमध्ये खळबळ माजली आणि अनेकांनी याबाबत तक्रार केली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज हा दुबईमध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षकांसह राहायचा. पण हे प्रकरण उघड झाल्यानंतर भारद्वाजचे हिंदुस्थानात प्रत्यार्पण करण्यात आले व त्याला नांदेड पोलिसांनी अटक केली. त्याआधी या प्रकरणातक दोन जणांना अटक झाली होती. त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांनी बालाजी दिगंबरराव पांचाळ (४४) आणि राजू रामराव मोतेवार (४६) या दोघांना पकडले. आर्थिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक एस.एम. ननवरे, पोलिस कर्मचारी अरूण राठोड, संभाजी शिवभक्त यांनी या दोघांना अटक केली.