अमेरिकेतील अपघातात हिंदुस्थानातील दोन विद्यार्थी ठार, कुटुंबीयांची केंद्राला विनंती

us-police

अमेरिकेत शिकणाऱ्या हिंदुस्थानाच्या तेलंगणातील दोन विद्यार्थ्यांचा अमेरिकेच्या ऍरिझोना येथे रस्ता अपघातात मृत्यू झाला.
त्यांच्या कुटुंबीयांना स्थानिक प्रशासनानं या अपघाताची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री (स्थानिक वेळेनुसार) पेओरिया येथे एका कारची दुसऱ्या कारशी समोरासमोर धडक झाल्याने निवेश मुक्का आणि गौतम कुमार पारसी दोघेही ठार झाले. दोघेही 19 वर्षांचे असल्याचं कळतं आहे.

निवेश हा करीमनगर जिल्ह्यातील हुजुराबाद शहराचा होता, तर गौतम कुमार हा जानगाव जिल्ह्यातील स्टेशन घानपूरचा होता. दोघेही ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते.

हे दोघे विद्यापीठातून मित्रांसह घरी परतत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. निवेश आणि गौतम यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही कारचे चालक जखमी झाले.

निवेश हा डॉक्टर दांपत्य नवीन आणि स्वाती यांचा मुलगा आहे. दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी हिंदुस्थान सरकारला मृतदेह घरी आणण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केलं आहे.