कश्मीरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत दोन जवान जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । श्रीनगर

दक्षिण कश्मीरातील शोपियां जिल्ह्यात लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन ऑलआऊट’मध्ये आज पहाटे दोन अतिरेक्यांचा खात्मा झाला. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. लष्कराच्या कारवाईत अडथळा आणणाऱ्या फुटीरवाद्यांना पांगवण्यासाठी केलेल्या लाठीमारात २० जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

शोपियां जिल्ह्यातील कुंदलन भागात एका घरात चार ते पाच अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. अतिरेक्यांची शोधमोहीम सुरू असल्याचे कळताच फुटीरवादी रस्त्यावर उतरले. बघता बघता दगडफेकीला सुरुवात झाली. लष्कराच्या एका पथकाने फुटीरवाद्यांना रोखून धरले आणि दुसऱ्या पथकाने घरावर हल्लाबोल केला. आपण चोहोबाजूने घेरले गेल्याचे लक्षात येताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. रात्रभर ही चकमक सुरू होती. पहाटेच्या सुमारास अतिरेक्यांकडील गोळीबार थंडावला. त्यानंतर जवानांनी घराची झाडाझडती घेतली असता दोन मृतदेह आढळून आले. जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी ठार झालेले दोन्ही अतिरेकी जैश-ए-मोहंमदचे असल्याचे सांगितले.