WIvsPAK वेस्ट इंडीजच्या दोन खेळाडू भर मैदानात कोसळल्या, स्ट्रेचरवरून नेण्यात आले बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 लढतीदरम्यान वेस्ट इंडीजच्या दोन महिला खेळाडू अचानक मैदानात कोसळल्या. या घटनेमुळे सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. दोन्ही महिला खेळाडूंना स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. दोघींना रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानच्या महिला संघात टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना अँटिगा येथे खेळला गेला. या लढतीत पाकिस्तानची फलंदाजी सुरू असताना वेस्ट इंडीजच्या दोन महिला खेळाडू कोसळल्या. दोघींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या खेळाडू बेशुद्ध कोणत्या कारणाने झाल्या याचा खुलासा झालेला नाही. परंतु उष्णतेमुळे असे घडले असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडीजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत होता. डावाच्या चौथ्या षटकात चिनेले हेन्री बेशुद्ध होऊन पडली. यानंतर थोड्या काळानंतर चेडियन नेशन देखील कोसळली. दोघींना तात्काळ वैद्यकीय मदत मिळाली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डकवर्थ ल्यूईसने जिंकला सामना

वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 6 गडी बाद 125 धावा केल्या. यानंतर पावसाचा व्यत्यय आल्याने पाकिस्तानच्या महिला संघाला 18 षटकात 111 धावांचे आव्हान देण्यात आले, मात्र पाकिस्तानचा संघ 6 विकेट्स गमावून 103 धावाच करू शकला. वेस्ट इंडीजने हा सामना 7 धावांनी आपल्या नावे केला.