प्रवेशासाठी बारावी व ‘सीईटी’चे प्रत्येकी 50 टक्के गुण असा फॉर्म्युला तयार करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सीईटी’च्या गुणांना अलीकडे अधिक महत्त्व आल्याने विद्यार्थी बारावीच्या परीक्षेऐवजी सीईटीत अधिक गुण कसे मिळतील याकडे लक्ष देत आहेत. त्याचा परिणाम बारावीच्या गुणांवर होत आहे. सीईटीवर अवलंबून राहण्यापेक्षा बारावीपुढील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी वेगळे धोरण आखण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी यापुढील काळात बारावीचे गुण 50 टक्के आणि सीईटीचे 50 टक्के असा फॉर्म्युला तयार करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

बारामतीतील कृषिक प्रदर्शनाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज भेट दिली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उदय सामंत म्हणाले, ‘बारावीला अधिक महत्त्व प्राप्त व्हावे, यासाठी नेमलेल्या समितीने राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे. त्यानंतर यासंबंधी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली होती. बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांना सध्या ‘सीईटी’चे गुण लक्षात घेऊन प्रवेश होतात. त्यामुळे विद्यार्थी सर्व लक्ष सीईटी परीक्षेवर पेंद्रित करतात. त्यांचे बारावीकडे दुर्लक्ष होते. भविष्यात बारावीचे 50 टक्के आणि सीईटीचे 50 टक्के गुण विचारात घेऊन प्रवेश देण्याचे धोरण आखण्यात येणार आहे. परंतु कृषी महाविद्यालयांचे यासंबंधी वेगळे मत येत आहे. त्यामुळे त्यावर अभ्यास सुरू आहे.’

ऑनलाइनकडून आता आपण ऑफलाइनकडे चाललो आहोत. कायमस्वरूपी आपण ऑनलाइन प्रणालीवर अवलंबून राहू शकत नाही. भविष्यात आपल्याला ऑफलाइन पद्धतीनेच परीक्षा घ्याव्या लागतील. ऑनलाइन हा पर्याय होता. ते कायमचे सोल्युशन नसल्याचे ते म्हणाले.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोनदा ‘सीईटी’
केंद्र सरकार त्यांच्या अखत्यारीतील परीक्षा दोन ते तीन वेळा घेते. त्याच धर्तीवर राज्यातील विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध व्हावी यासाठी वर्षातून दोनदा ‘सीईटी’ घेण्याचा निर्णय आम्ही घेणार असल्याचेही सामंत म्हणाले.