उदयनराजेंच्या निवासस्थानातून चांदीची बंदूक चोरणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानातून शोभेची चांदीची दोन किलोची बंदूक चोरून नेणाऱ्या युवकास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. आणखी काही शोभेच्या कस्तू त्याने चोरल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दीपक पोपट सुतार (वय 26, रा. माची पेठ, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजवाडा परिसरात गस्त घालत असताना दीपक सुतार याच्याकडे चांदीची बंदूक असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे ही बंदूक कुठून आणली, अशी चौकशी केल्यानंतर त्याने सुरुवातीला माझ्या एका मित्राने दिली असल्याचे सांगितले. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने ही दोन किलोची चांदीची शोभेची बंदूक खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानातून चोरल्याची कबुली दिली.