
मनोज श्रीवास्तव, लखनौ
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील ‘रामलल्ला’चे दर्शन घेऊन राममंदिराच्या उभारणीसाठी देशव्यापी दबावाचा रेटाच उभा केला आहे. त्यातून राममंदिराच्या लढय़ाचे नेतृत्व त्यांनी शिवसेनेकडे खेचून घेतल्याचे मानले जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या भेटीने देशात पुन्हा एकदा हिंदुत्वाचे भगवे तुफान आणले. हे तुफान सर्वत्र पसरू लागले असून या तुफानालाच राममंदिराची मुर्हूतमेढ म्हणून भविष्यात गणले जाणार आहे. त्यामुळे राममंदिराच्या प्रश्नावर राजकारण करणारे राजकीय पक्ष चिंतेत पडले आहेत.
हिंदुत्ववादी संघटनांची तारांबळ
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या भेटीचे दमदार पाऊल शिवसेनेने उचलल्यानंतर संघ आणि संघ परिवारातील हिंदुत्ववादी संघटनांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यांनी शिवसेनेच्या भगव्या तुफानाला थोपवण्याचा प्रयत्न आपल्या परीने केला. राममंदिराच्या प्रश्नावर विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ‘संघा’चे कृष्ण गोपाल, खासदार लल्लू सिंह यांच्यासहित भाजपचे काही नेते धावून गेले. मात्र शिवसैनिकांच्या तुफानाला रोखणे कोणालाही शक्य झाले नाही.
उलट उद्धव ठाकरे यांनी दिलेला ‘पहले मंदिर, फिर सरकार’चा नाराच विश्व हिंदू परिषदेच्याही कार्यक्रमात घुमला. राममंदिरापुढे सत्तेला तुच्छ समजण्याच्या उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे रामभक्तांचा शिवसेनेवरील विश्वास वाढल्याचे दिसून आले.
मोदींना कंठ फुटला
गेली तब्बल चार वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राममंदिराच्या उभारणीच्या प्रश्नावर मूग गिळून बसले होते; पण उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या भेटीने मोदींना राममंदिराच्या मुद्दय़ावर बोलते केले. राजस्थानातील अलवर येथील प्रचारसभेत मोदी यांनी राममंदिराच्या प्रश्नावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. राममंदिराच्या उभारणीला विलंब लागण्यास काँग्रेसच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.
उमा भारतींकडून उद्धव ठाकरे यांची प्रशंसा
लोकसभा निवडणुकीआधी अयोध्या येथील राममंदिराच्या उभारणीचा प्रश्न ऐरणीवर आणून त्यासाठी दबाव वाढवल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपच्या अनेक नेत्यांकडून टार्गेट करणे सुरू असले तरी केंद्रीय मंत्री उमा भारती मात्र त्याला अपवाद ठरल्या आहेत. कारण अयोध्या येथील राममंदिर उभारण्याच्या मुद्दय़ावर उमा भारती यांनी उद्धव ठाकरे यांची तोंडभरून स्तुती केली आहे. तसेच राममंदिर हे काही एकटय़ा बीजेपीचे पेटंट नाही असेही त्यांनी सुनावले आहे. ‘होय’, राममंदिराच्या उभारणीसाठी उद्धव ठाकरे यांनी केलेले प्रयत्न हे निश्चितच प्रशंसनीय आहेत. त्यांनी ज्या तडफेने हे प्रयत्न केले त्याबद्दल मी त्यांची प्रशंसा करते. प्रभू श्रीराम हे सर्वांचेच दैवत आहेत. एकटय़ा बीजेपीकडे काही राममंदिराचे पेटंट नाहीए. त्यामुळे एसपी, बीएसपी, अकाली दल, ओवेसी आणि आजम खान या सर्वांनी राममंदिर निर्माणासाठी पुढे यावे असे मी त्यांना आवाहन करते, असेही उमा भारती यावेळी म्हणाल्या.






















































