जोवर स्पष्टता नाही तोवर विधेयकाला राज्यसभेत पाठिंबा नाही! उद्धव ठाकरे यांची ठाम भूमिका

822

नागरिकत्व विधेयकाबाबत शिवसेनेने काय भूमिका घ्यावी हे कोणी शिकवू नये. याबाबत एकमेकावर आगपाखड करण्याऐवजी बिलाविषयीची सत्यता आणि स्पष्टता अधिक चांगल्या पद्धतीने देशासमोर यायला हवी. ही देशाचे भवितव्य ठरविणारी भूमिका आहे. त्यामुळे या बिलाबाबत लोकसभा-राज्यसभा सदस्यांकडून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत शिवसेना राज्यसभेत या बिलाला पाठिंबा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत आज मांडली.

विधान भवन येथे पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबतची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे म्हणाले, खरोखर हे बिल विरोध करणाऱ्यांना आणि पाठिंबा देणाऱ्यांना कळलं आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून कोणी एकमेकावर आगपाखड करण्याऐवजी बिलामधील सत्यता आणि स्पष्टता ही अधिक चांगल्या पद्धतीने देशाच्या जनतेसमोर यायला हवी. ज्यांच्यावर अत्याचार होत असेल असे नागरिक तुम्ही बाहेरून देशात आणू पाहत आहात ते नेमके कोणत्या राज्यात राहणार आहेत आणि त्यांची जबाबदारी कोण घेणार आहेत, हे प्रत्येक राज्याला कळायला हवं.

लोकसभेत आम्ही काही प्रश्न उठवले आहेत. मात्र त्याचे उत्तर मिळालेले नाही. काल गृहमंत्र्यांनी कदाचित शिवसेना सोडून अन्य पक्षांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला असं मी ऐकलं आहे. शिवसेनेने जे प्रश्न उठवले आहेत त्याची उत्तरे मिळाली किंवा नाहीत हे माहीत नाही. पण आम्ही जे प्रश्न उठवले ती आमची खास बाब नाही तर हे देशाचे प्रश्न आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

देशाला वादात अडकवून जीवनावश्यक प्रश्नांवर उत्तरे द्यायची नाहीत हा कारभार मी मानत नाही

इतर देशांतील पीडित लोक आहेत त्यांना जरूर घ्या, पण आपल्या देशात जी काही पीडित लोकं आहेत त्यांचं काय? काल मी सीमाभागातील बांधवांना बोलावलं होतं. ती कोण लोकं आहेत. काल कर्नाटकात भाजपचं सरकार आलेलं आहे. त्यांनी पोटनिवडणुकीत जागा जिंकलेल्या आहेत. अशा परिस्थितीत बेळगाव, कारवार, निपाणीसह जो मराठी बांधव आक्रोश करीत आहे, त्यांच्यावर भाषिक अत्याचार होतोय तो अत्याचार थांबविण्याचं काम कोणाचं आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आपल्या देशात भूमिपुत्राचं काय करताय? लोक बेरोजगार होत आहेत, कांद्याचे भाव वाढताहेत; या सर्व बाबींकडे तुम्ही कधी लक्ष देणार आहात? देशाला एका वादात अडकवून ठेवायचं आणि जीवनावश्यक प्रश्नांवर उत्तर न देता देश पुढे ढकलंत राहायचं याला कारभार मानायला मी तयार नाही, अशी परखड भूमिका उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडली.

भाजप करेल ते देशहित आणि अन्य करतील तो देशद्रोह या भ्रमातून बाहेर या!

राज्यसभेत या बिलावर सविस्तर चर्चा व्हायला हवी. हा कोण्या एका पक्षापुरता मर्यादित प्रश्न नाही तर हा पूर्ण देशाचा प्रश्न आहे. यामध्ये जर मतांचे राजकारण होत असेल तर ते अयोग्य आहे. कुणाला बरं वाटावं आणि कुणाला वाईट वाटावं हे बघून शिवसेना कधीच वागत आलेली नाही. भाजप करेल तेच देशहित आणि इतर सर्व करतील तो देशद्रोह या भ्रमातून सर्वांनी बाहेर यायला हवं. देशाच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होत असेल तर याबाबत अधिक विस्ताराने सर्वांची मते जाणून घेण्याची गरज आहे, असे ठाम मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडले.

 

आपली प्रतिक्रिया द्या