मुर्मू यांना पाठिंब्याबाबत उद्धव ठाकरे घेणार दोन दिवसांत निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी पार पडत असून यासंदर्भात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. यावेळी राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी आणि महिला उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याचा विचार करावा, अशी भूमिका शिवसेना खासदारांनी मांडली. यासंदर्भातील अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांत घेणार आहेत.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीत एनडीएकडून आदिवासी महिला आणि झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. मातोश्री निवासस्थानी आज झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीविषयीची माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि गजानन कीर्तिकर यांनी दिली. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले, आज झालेल्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार द्रौपदी मुर्मू तसेच यशवंत सिन्हा यांच्याबाबत चर्चा झाली. शिवसेनेने अनेकदा राजकारणापलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना आपले पाठबळ दिले आहे. याआधीही राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी प्रतिभाताई पाटील, टी. एन. शेषन, प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे. आजही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असून सर्व खासदारांनी निर्णय घेण्याचे अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेले आहेत. पक्षप्रमुखांचा जो आदेश आहे तो शिवसेनेचे खासदार आणि आमदार यांना बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्राच्या, देशाच्या भावना समजून ते निर्णय घेतील आणि त्या निर्णयामागे सर्व खासदार ठामपणे उभे राहतील़  त्याचप्रमाणे खासदार गजानन कीर्तिकर यांनी द्रौपदी मुर्मू या जरी एनडीएच्या उमेदवार असल्या तरी त्या एक आदिवासी आणि महिला आहेत. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी त्यांना मतदान करावे, अशी भूमिका शिवसेनेच्या सर्व खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतील, असे सांगितले.

शिवसेनेचे 13 खासदार बैठकीला उपस्थित

शिवसेनेचे 13 खासदार या बैठकीला उपस्थित होते. तर संजय जाधव हे आजारी असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. संजय मंडलिक हे बैठकीसाठी दिल्लीत होते आणि हेमंत पाटील यांनी उपस्थित राहू शकणार नसल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवले होते. कलाबेन डेलकर या पावसामुळे बैठकीला पोहचू शकल्या नाहीत. त्याचप्रमाणे भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, अशी माहिती खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिली.