देशाने एक महान सुपुत्र गमावला! उद्धव ठाकरे यांची आदरांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दुःखद निधनाने देशाने एक महान सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

मनोहर पर्रीकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसेना पक्षप्रमुखांनी तीक्र दुःख व्यक्त केले आणि पर्रीकरांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. उद्धव ठाकरे म्हणाले, राजकारणात मुख्यमंत्रीपद व देशाचे संरक्षणमंत्रीपद भूषविणाऱ्या व्यक्तीने किती साधे असावे याचे उदाहरण म्हणजे मनोहर पर्रीकर. पर्रीकर आणि आमचा स्नेहसंबंध होता. अनेकदा भेटीगाठी होत, बोलणेही होत असे. राजकारणातील प्रामाणिकपणाबद्दल अनेकदा बोलले जाते, पण प्रामाणिकपणा काय असतो हे पर्रीकरांनी दाखवून दिले.

गोव्यासारख्या लहान राज्यातून राजकीय कारकीर्द सुरू करून ते देशाचे संरक्षणमंत्री झाले ते त्यांच्यातील प्रामाणिकपणामुळेच. अत्यंत अवघड स्थितीत त्यांनी संरक्षणमंत्रीपद भूषवले. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचे नेतृत्व हे संरक्षणमंत्री म्हणून पर्रीकरांनीच केले होते. पर्रीकर हे भाजपचे नव्हे तर देशाचे आशास्थान होते. दिल्लीतून ते मुख्यमंत्री म्हणून पुन्हा गोव्यात गेले आणि त्यांच्या प्रिय गोमांतकातच ते कायमचे विसावले. पर्रीकर यांचे स्मरण गोवा, महाराष्ट्र आणि देशाला सदैव राहील. आम्ही मनोहर पर्रीकर यांना माझ्या लाखो शिवसैनिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत.

शिवसेना-भाजप युतीचे संयुक्त मेळावे पुढे ढकलले
मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे शिवसेना-भाजप युतीने सोमवारी होणारे मेळावे पुढे ढकलेले आहेत. उद्या कोकणचा नवी मुंबईतील तसेच पश्चिम महाराष्ट्रचा पुणे येथील मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.