ऐतिहासिक! शिवसेना-वंचित आघाडीची युती!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, वैचारिक प्रदूषणातून मोकळा श्वास घेण्यासाठी आणि संविधान टिकवण्यासाठी निर्णायक पाऊल!

मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एका नव्या पर्वाला सुरुवात करणारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीची ऐतिहासिक युती आज झाली. नायगावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या भरगच्च संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात आली. देशाला सध्याच्या वैचारिक प्रदूषणातून मोकळा श्वास घेण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि संविधानाचे पावित्र्य टिकवण्यासाठी एकत्र येत असल्याचे या वेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ही युती म्हणजे ‘नये रास्ते, नये रिश्ते’ असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्राची जनता ज्या स्वप्नाची वाट पाहत होती ते स्वप्न हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी पूर्ण होत असल्यामुळे हा क्षण आनंद आणि समाधानाचा असल्याचे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. ठाकरे आणि आंबेडकर यांच्या नावाला एक वेगळा इतिहास, वेगळी पार्श्वभूमी आहे. आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समकालीन होते. एकमेकांचे स्नेही होते. त्यांनी समाजातील वाईट प्रथा, परंपरा, रूढींवर आघात केले. सध्या राजकारणातही काही वाईट परंपरा, ‘चाली’ चाललेल्या दिसत आहेत. त्या मोडून-तोडून टाकण्यासाठी आम्ही दोन्ही पिढय़ांचे वारसदार एकत्र येत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी दोन्ही पिढय़ांचे सोबत देणारे, जिवाला जीव देणारे सहकारी सोबत असल्याचेही ते म्हणाले. पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून पुढील राजकीय वाटचाल पुढे जशी परिस्थिती असेल तसा निर्णय घेतला जाईल. हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व हाच आमचा श्वास आहे. देश आणि माणुसकी आमचा धर्म आहे. प्रत्येकाच्या धर्माचा आदर करून त्यामधील वाईट रूढी-परंपरा दूर करण्याचे काम दोघांच्या आजोबांनी केले होते. हे काम पुढे घेऊन आम्ही जाणार आहोत, असे ते म्हणाले.

ही युती विजयी दिसेल!

तीन पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर तिन्ही पक्षांनी आपापल्या मित्र पक्षांचे हित सांभाळायला हवे. आपण जर असे केले नाही तर वैयक्तिक युतीचा काय फायदा, असा सवालही त्यांनी यावेळी केला. कारण ‘देश प्रथम’ या सामायिक हेतूला तडा जाता कामा नये. तुमची आमची युती झालीच आहे, पुढे महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून वाटचाल करायला काहीच हरकत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यांना विरोधकच नकोय!

स्वार्थासाठी भाजपने युती तोडली. त्यांना विरोधक नकोय. मित्र नकोत, पक्षातील नेतृत्व नकोय. त्यामुळे त्यांनी नेतृत्वाची एक फळीच कापली आहे. देश हुकूमशाहीकडे चालला आहे. त्यांना न्यायसंस्थाही बुडाखाली घ्यायच्या आहेत. हे कोणत्या घटनेत बसतेय, असा सवालही त्यांनी यावेळी केला. पेंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या वक्तव्याबाबत बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.

शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना विभाग क्र. 10 च्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचा विभागप्रमुख महेश सावंत यांनी सत्कार केला.

मोहन भागवत मशिदीत गेले तर हिंदुत्व सुटते का? तुम्ही पीडीपीबरोबर युती करायची, संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांशी युती करायची हे कसे चालते? 25 वर्षे आम्ही प्रामाणिकपणे युतीधर्म निभावला. मात्र केवळ आम्ही ‘वटपौर्णिमा’ करायची आणि त्यांनी बाहेरख्यालीपणा करायचा हे चालणार नाही.

दुसऱ्याचं घर फोडून स्वतःचे घर सजवणारी औलाद

शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही असे गृहित धरले जात होते. अडीच-
तीन वर्षांपूर्वी जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा मला काही जणांकडून सांगण्यात येत होतं की, पवार साहेबांचा लौकीक तुम्हाला माहीत आहे ना? ते तुम्हाला कधी पण दगा देतील. मी त्यांच्याकडे पाहत राहिलो आणि माझ्याच लोकांनी मला दगा दिला, असेही उद्धव ठाकरे यावेळी सांगितले. दुसऱ्याचं घर फोडून स्वतःचे घर सजवणारी औलाद राजकारणात येऊ पाहत आहे. ती गाडून टाकण्याची गरज असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.

निवडणुकीपुरता गोरगरीबांचा उदो उदो

लोकांना भ्रमात ठेवून राजकारण करायचे, नको त्या गोष्टीत अडकवून ठेवायचे आणि आपले ईप्सित साध्य करायचे, असे सर्व सुरू आहे. फक्त निवडणुकीपुरता गोरगरीबांचा उदो उदो करायचा आणि त्यांनी मते दिल्यानंतर त्यांचीच ‘उड्डाणे’ सुरू होत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी मोदींच्या मुंबई दौऱ्याचा दाखलाही दिला. यावेळी माणसे कुठून आली, कशी आली हे आपण प्रसारमाध्यमातून वाचल्याचे सांगत टोलाही लगावला. हे सर्व थांबवण्यासाठी या गोष्टी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवायची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.