औरंगजेबाच्या सरदाराच्या घोड्यांना पाण्यात संताजी-धनाजी दिसायचे, तसा महाराष्ट्राला लुटणाऱ्या दरोडेखोर अहमदशहा अब्दालीच्या खेचरांना जिकडे-तिकडे उद्धव ठाकरे दिसतात. होय… ही खेचरेच आहेत, पण यांना अजून महाराष्ट्राचे पाणी माहीत नाही. ज्या ज्या वेळी अब्दालीने महाराष्ट्रावर चाल केली त्या त्या वेळी आपले तेज महाराष्ट्राने दाखवून दिले. एकदा सामना होऊ द्या… मग महाराष्ट्राचे पाणी काय असते ते अहमदाबादमधला अहमदशहा अब्दाली आणि त्याच्या फौजेला दाखवतोच, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. पाऊण तासाच्या तडाखेबंद भाषणात महाराष्ट्र भीकेपंगाल करण्याचे कारस्थान रचणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला. फडणवीस-मिंधेंवरही त्यांचा आसुड कडाडला. राज्याला लुटणाऱ्यांना गाडणार आणि तोतयांची वळवळ कायमची संपवणार अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवसेनेच्या भगव्या सप्ताहाच्या समारोपानिमित्त गडकरी रंगायतनमध्ये शिवसैनिकांचा मेळावा प्रचंड गर्दीत पार पडला. रंगायतन गर्दीने ओव्हरपॅक झाले होते. तळमजलाही शिवसैनिकांच्या उत्साहाने फुलून गेला होता. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत जाणीवपूर्वक दुबार मतदार वाढवून मिंधे-भाजपला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा दिला. दुबार मतदारांची नावे कमी करा असे सांगूनही कलेक्टरने ती केली नाहीत. तीन महिने थांबा, मग हे सरकारही कलेक्टर आणि मिंध्यांचे कलेक्टर कुठे पाठवतो ते पहा… यांना तुरुंगाचे गज मोजायला लावणारच, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
मोदींनी प्रकल्प दिला तो कुठे आहे?
आणखी एक प्रकल्प गुजरातला जात असल्याचे कळतेय. यांनी प्रकल्प चोरायचे, मग आमच्या मुलाबाळांनी काय करायचे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. जे महाराष्ट्राला भिकेला लावताहेत त्याच मोदींसमोर मिंधे भिकेचा कटोरे घेऊन उभे राहतात. मागे हेच मिंधे बोलले होते की, काळजी करू नका. मोदी म्हणाले याहून मोठा प्रकल्प देतो. मोदींनी किती मोठा प्रकल्प दिला? तो महाराष्ट्रात आला का? अजूनही शेतकरी आत्महत्या करताहेत, बेकारांचे लोंढे फिरताहेत. म्हणूनच आमची लढाई या महाराष्ट्रद्वेष्टय़ांविरोधात आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
…तर मिंधेंची दाढी उगवलीच नसती
हे शिवसेनाप्रमुखांचे ठाणे आहे. त्यांचे ठाण्यावर अतोनात प्रेम होते. ठाणेकरांनीही शिवसेनाप्रमुखांवर प्रेम केले. ही सगळी ठाणेकरांची मेहनत.. ही मेहनत झाली नसती तर मिंधेंची दाढी उगवलीच नसती असे फटकारे उद्धव ठाकरे यांनी लगावले.
शिवसैनिक आणि जनता हीच माझी वाघनखं
लंडनच्या संग्रहालयातून सध्या वाघनखे महाराष्ट्रात आणली आहेत. हाच संदर्भ घेऊन उद्धव ठाकरे म्हणाले, माझी वाघनखं म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक आणि जनता आहे. ज्या ज्या वेळी अहमदशहा अब्दालीने महाराष्ट्रावर चाल केली त्या त्या वेळी महाराष्ट्राने आपले तेज दाखवून दिले. ते तेज पुन्हा दाखवण्याची वेळ आली आहे. त्या अब्दालीला आता येऊच दे असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना दिले.
ठाणे महापालिकेला कर्जबाजारी कोणी केले?
ठाण्यात क्लस्टर योजनेतल्या ठेकेदारांवर मिंधेंची ‘महाप्रीत’ जडली आहे. कॉन्ट्रक्टर हेच ठरवणार, टेंडर त्यांनीच भरायचं, महापालिकेतील टेंडरही ठराविक कॉन्ट्रक्टरनाच मिळणार. आता तर ठाणे महापालिकेला कर्जाचे डोहाळे लागले आहेत. या महापालिकेला कर्जबाजारी कोणी केले? सगळीकडे खड्डे पाडून लुटमार सुरू आहे. कुठे गेले पैसे? कुठे केला खर्च? तीन महिने थांबा तुमचा जो काही ‘मित्र’ परिवार आहे त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
राज्याचे मंत्रालय मुंबईत हवे की अहमदाबादेत?
राज्याचे मंत्रालय मुंबईत हवे अहमदाबादेत असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला तेव्हा ‘मुंबई आमच्या हक्काची.. नाही कुणाच्या बापाची’ अशा गगनभेदी घोषणा शिवसैनिकांमधून घुमल्या. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ही महाराष्ट्र द्वेष्टय़ांविरोधातील लढाई आहे. जे मोदींसमोर भीकेचा कटोरा घेऊन महाराष्ट्राला भिकेला लावतात त्या तोतयांची वळवळ येत्या विधानसभा निवडणुकीत संपवणारच असा वज्रनिर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
सवापाच लाख ठाणेकर निष्ठेने उभे राहिले
लबाडी करून खोकासूर जिंकले, पण मी ठाणेकरांचे कौतुक करायला आलो आहे कारण पैशांचं इतकं वाटप होऊनही सवापाच लाख ठाणेकर शिवसेनेच्या राजन विचारेंसोबत निष्ठेने उभे राहिले. कल्याणमध्ये वैशाली दरेकरांसमोर मिंध्यांचं कार्ट होतं. मिंधे तिथे ठाण मांडून बसले होते. पण तरीही वैशालीताईंचा पराभव करायला त्यांना विश्वगुरुला आणावं लागलं. इततं करूनही साडेचार लाख मते वैशाली दरेकर यांना मिळाली. प्रचंड पैसा ओतूनही विजय दिसत नसल्यानेच त्यांनी लांडय़ालबाडय़ा केल्या. पदवीधर मतदारसंघात आणि शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचा विक्रमी मतांनी विजय झाला. म्हणजेच मुंबई, ठाणे, कोकण माझंच आहे. तिथे शिवसेनेचा पराभव कसा होऊ शकतो? पण हे त्या अहमदशहा अब्दालीचे चाळे आहेत. त्यांना गाडणार म्हणजे गाडणारच अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली. ठाण्यात लोकसभेला निसटता पराभव झाला, पण विधानसभेला खणखणीत विजय हवाच असे आवाहन त्यांनी केले.
पंधराशे रुपयांची लाच देऊन महाराष्ट्र लुटण्याचे कारस्थान
लाडकी बहीण योजनेचा लाभ जरूर घ्या. कारण हे पैसे तुमचेच म्हणजे जनतेचे आहेत. पण पंधराशे रुपयांची लाच देऊन अहमदशहा अब्दाली महाराष्ट्र लुटायला येतोय. इतके हे लक्षात ठेवा असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
आता दूत घोटाळा
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांनी सुरू केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी पन्नास हजार योजना ‘दूत’ नेमण्यात येणार आहेत. त्या प्रत्येक दुताला म्हणजे दहा हजार रुपये महिना मिळणार आहे. त्यातसुद्धा ही चांडाळचौकडी खोटी नावे टाकून त्यातील पैसे काढेल. म्हणजेच हा एक मोठा ‘दूत घोटाळा’ आहे असा खोके सरकारचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला.
कारसेवकांचे रक्त लोढाचा टॉवर बांधण्यासाठी सांडवलं का?
भाजपाचे बगलबच्चे आणि गद्दार मिंधे ठाण्यातले, मुंबईतले आणि अयोध्येतले भूखंड खात सुटले आहेत. जसा आदर्श घोटाळा मुंबईत झाला होता तसाच एक घोटाळा अयोध्येत झाला आहे. सैन्य दलाची जमीन बिल्डर मंगलप्रभात लोढाच्या घशात घातली आहे. यासाठी तुम्हाला अयोध्येत राम मंदिर हवं होतं का? यासाठी तुम्ही आम्हाला लढवलंत का? कारसेवकांचे रक्त लोढाचा टॉवर बांधण्यासाठी सांडवलं का? असा घणाघाती सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ते पुढे म्हणाले, अयोध्येची जमीन लोढा खातो आणि आम्ही फक्त जय श्रीरामच्या घोषणा देतो. तुम्ही मंदिराच्या आजुबाजुच्या जागा सोडत नाहीत, देवाचं सोनं सोडत नाहीत. वाराणसीत मूर्तीसुद्धा कापल्या, हेच तुमचे हिंदुत्त्व?
रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबांचे केले सांत्वन
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र व उपशहरप्रमुख मिलींद मोरे यांचा वसई येथील टोळक्याच्या हल्ल्यात काही दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला होता. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या ठाणे दौऱ्यात मोरे यांच्या चंदनावाडी येथील घरी जाऊन त्यांचे व कुटुंबाचे सांत्वन केले. खचून जाऊ नका. शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा धीर उद्धव ठाकरे यांनी दिला.
मनसेच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले
गडकरी रंगायतनबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण शिवसैनिकांनी मुहँतोड जबाब देत मनसेच्या कार्यकर्त्यांना गडकरी रंगायतन परिसरातून पिटाळून लावले. यावेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात होता. गोंधळ घालणाऱ्यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले.
या मेळाव्यास शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, विजय कदम, अल्ताफ शेख, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, डोंबिवली जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, धनंजय बोडारे, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, वैशाली दरेकर, मिरा-भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, गुरुनाथ खोत, संजय ब्रीद, नरेश मणेरा, महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, प्रवक्ते अनिश गाढवे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महेश्वरी तरे, मंदार विचारे, समन्वयक संजय तरे, विभागप्रमुख सचिन चव्हाण, प्रकाश पायरे, सचिन मोहिते, वसंत गव्हाळे, अनिस शेख, कृष्णकुमार कोळी उपस्थित होते.