इर्शाळवाडीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज!

संपूर्ण राज्यातील डोंगर उतारावरील, दरडप्रवण भागातील वस्त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे असून प्रशासनाच्या सोबतीने यासाठी एक योजना तयार केली पाहिजे असं मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ठाकरे यांनी शनिवारी रायगडमधील दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी येथे जात तिथल्या दुर्घटनाग्रस्तांशी संवाद साधला. ह्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ग्रामस्थांप्रती संवेदना व्यक्त करत, बचावलेल्या प्रत्येकाच्या सोबत आम्ही आहोत असा विश्वास त्यांनी ह्यावेळी दिला. दुर्घटनाग्रस्तांना भेटल्यानंतर ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अशा दुर्घटना घडूच नयेत यासाठी आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यायला हवं

उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, “मदत दिली ठीक आहे मात्र माणसे गेली ती किती लाखांत परत येतील? ती परत येऊ शकत नाहीत. तात्पुरता दिलासा म्हणून ठीक आहे. आज मला दुर्घटनाग्रस्तांशी बोलताना लाज वाटत होती, मी त्यांचं सांत्वन कसं करू ? आपल्याकडे आपल्याला निवेदनं येतात, ती निवेदनं कचऱ्याच्या टोपलीत टाकायची का ? निवेदनं देण्याची गरज नाहीये. आपल्याला माहिती आहे लोकं कुठे राहतात. आपल्याकडे प्रशासन आहे , त्यांना विभागवार एकत्र करून मांडणी केली तर कायमस्वरुपी तोडगा काढू शकतो. “

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, दुर्घटना घडल्यानंतर आपण धावपळ केल्यासारखं दाखवतो त्यापेक्षा सगळ्या पक्षांनी याबाबतीत राजकारण बाजूला ठेवून एकत्र यायला हवं. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाल्यानंतरही आदिवासी, प्रकल्पग्रस्तांना हे जीवन जगावं लागतं,त्यांच्या डोक्यावर कोसळत्या दरडीचं संकट असतं. याकरता तातडीने इर्शाळवाडीच्या आसपासच्या वस्तींना एकत्र करून एक योजना करायला हवी. राज्यात अशा जितक्या वस्त्या आहेत त्यांचे त्या-त्या भागात, जवळच्या गावांमध्ये किंवा परिसरात पुनर्सवन कसं करू शकतो हे तहसीलदार, कलेक्टरना सांगून एक योजना केली पाहिजे. या योजनेला सरकार कोणाचेही असो स्थगिती देता कामा नये.

तळीये गावातील दुर्घटनेला 2 वर्ष होऊन गेली आहे. आपण तिथे जाऊन किती जणांचे पुनर्सवन झाले हे पाहणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.