हिम्मत असेल तर मैदानात या! उद्धव ठाकरेंचे गद्दारांना आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेने अनेक वादळं अंगावर घेतली. पण आता त्यांचा सामना करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीमधील अनेक मोठी वादळं सोबत आहेत. शरद पवारांसारखे वादळ निर्माण करणारे सोबत असल्यानंतर आता मला चिंता नाही. वादळ असो पाऊस असो ते न डगमगता उभे राहतात. तुम्ही सगळे सोबत असल्यानंतर मी तर फक्त लढाईचीच वाट बघतोय. हल्ली प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जावं लागत आहे. हिम्मत असेल तुम्ही तर मैदानात या, आम्ही तयार आहोत. दोघेही एका व्यासपीठावर येऊ मग होऊन जाऊदे काय व्हायचं ते. असा आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना केले आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, छगन भुजबळांना 75 वर्षे पूर्ण झालीत आणि योगायोग असा आहे की देशाच्या स्वातंत्र्याची देखील पंच्याहत्तरी आहे. भुजबळांचे कौतुक करण्याची गरज नाही कारण ती असती तर एवढी गर्दी जमली नसती. आता मर्द लोकांच्या हातात मशाल देण्याची आवश्यकता आहे, हेच नियतीच्या मनात असेल. अजित दादा म्हणाले की चार महिने अधिक मिळाले असते तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते. पण माझे असे म्हणणे आहे की भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते त्याआधीच मुख्यमंत्री झाले असते.

आम्ही आता धक्काप्रूफ झालो आहोत. खरंतर भुजबळ यांनी शिवसेना सोडली तेव्हा ठाकरे कुटुंबियांना पहिला मानसिक धक्का बसला. माँ साहेब व बाळासाहेब हे देखील धक्क्यात होते. आपल्या कुटुंबातील माणूस आपल्याला सोडून जाऊच कसा शकतो हा धक्का होता. राग येणे हा राजकारणाचा भाग झाला. या धक्क्यातून सावरताना आम्हाला खूप काळ लागला. बाळासाहेब असताना हे सगळं मिटवून टाकलत ही गोष्ट तुम्ही चांगली केलीत. भुजबळ घरी आले त्यांचं स्वागत झाले त्यांनी मतभेत मिटवून टाकले हे फार चांगलं झालं. पण त्यावेळी माँ असती तर आणखी बरं झालं असतं.

वयाने माणूस मोठा होत असतो पण जेव्हा तो विचाराने थकतो तेव्हा तो वृद्ध होतो. म्हणूनच आजही भुजबळ आणि फारूख अब्दुल्ला हे त्यांचं वय 75 मानायला तयार नाहीत. अशा तरुण मनात एक जिद्द असावी लागते. एकीकडे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडे शरद पवार अशी दोन उत्तुंग व्यक्तिमत्व भुजबळांना मार्गदर्शक म्हणून लाभली. असे भाग्य फार कमी लोकांच्या वाट्याला येतं. पण या दोन्ही मार्गदर्शकांच्या त्यांनी कधीही दुरुपयोग केला नाही आणि म्हणूनच त्यांनी स्वतःचा मार्ग स्वतः निवडला म्हणून भुजबळ आजही तरुण आहेत. फारुख अब्दुल्ला आणि बाळासाहेब यांची मैत्री होती. ते आज मला आल्या आल्या बोलले अजिबात घाबरू नकोस तू वडिलांसारखा लढ. ही लढाई आम्ही सोडणार नाही. असे ठाकरे म्हणाले.

तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या रूपात एक नवीन समीकरण आपण जन्माला घातलं. हे समीकरण आपण यशस्वी चालवून दाखविले. ते पाहून विरोधकांच्या पोटात गोळा येणं साहजिक आहे. विधान भावनाची एक वैचारिक उंची आहे. मी अनेकदा केशवराव धोंडगेंचे भाषण विधान भवनाच्या गॅलरी मधून ऐकलं आहे. छगन भुजबळ हे त्याकाळी शिवसेनेचे एकमेव आमदार होते त्याआधी वामनराव महाडिक हे शिवसेनेचे एकमेव आमदार होते. त्यावेळी वसंतराव नाईकांनी बाळा साहेबांना फोन केला आणि तुम्ही काय माणूस पाठवलाय, तो बोलायला उभा राहीला की सगळं सभागृह त्याच भाषण ऐकायला उभं राहतं. असे कौतुक त्यांनी केले होते. मात्र हल्ली कोण काय बोलतो कसा बोलतो याचा काहीही नेम नसतो. हल्ली काही बोलल्यास हक्कभंगाची कारवाई करा अशी नरहरी झिरवाळ यांच्याकडे मागणी होते. मात्र सतत राजकारणाचा विचार करण्यापेक्षा विचाराने राजकारण करणे गरजेचे आहे, हा विचारच कोणी करत नाही. मला सगळं पाहिजे आणि कोणी प्रतिस्पर्धी शिल्लकच राहता कामा नये अशी हल्ली अनेकांची मानसिकता झाली आहे. असे ठाकरे म्हणाले.

भुजबळ यांचा राजकीय जन्म शिवसेनेत झाला. ते पहिली निवडणूक हरले होते. उमेदवारी अर्ज भरण्याचं त्यांचं वय नव्हतं तरी त्यांना उमेदवारी दिली, ते लढले. त्यावेळी ते जिंकले असते तर काय केले असते. पण आयुष्यातली पहिली निवडणूक हारून देखील हा माणूस जिद्दीने उभा राहीला. त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी करून दाखवलं. बेळगाव मध्ये तेव्हाचा फोटो जर कोणी पहिला तर अजून आरोप होईल की बघा यांनी हिंदुत्व सोडलं. 75 व्या वाढदिवसाला मांडीला मंडी लावून बसलो तरी बोलतील हिंदुत्व सोडलं. भुजबळांची ही पहिली पंच्याहत्तरी आहे. त्यामुळे भुजबळ यांनी मला त्यांच्या पुढच्या पंच्याहत्तरीला देखील बोलवावं. असे ते म्हणाले.

यावेळी ठाकरे म्हणाले की, कार्यकर्त्यांना देखील माझं सांगणं आहे की केवळ नेत्यांचा जयजयकार नको. पवार साहेब आज बढो, भुजबळ साहेब आगे बढो बोलत असताना तुम्ही देखील आमच्या सोबत राहायला हवं. कारण ही लढाई फक्त माझ्या एकट्याची किंवा शिवसेनेची नाही तर देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीच्या वर्षात पुन्हा एकदा देशाच्या स्वातंत्र्याची ही लढाई आहे. शिवसेनेची निशाणी ही विचारांची धगधगती मशाल आहे. बाळासाहेबांचे जुने साथी भुजबळ हे जाताना एकटे गेले आणि आज संपूर्ण राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत घेऊन आले. अशा या भुजबळांना निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.