
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर अमरावतीमध्ये घडलेल्या फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयात 11 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. आरोपींनी एक दहशतवादी टोळी तयार करून उमेश कोल्हे यांचा बदला घेण्यासाठी गुन्हेगारी कट रचला होता, असा दावा आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे. उमेश कोल्हे यांनी नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यानंतर त्यांची हत्या झाली होती.
नूपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून संपूर्ण देशभर वादंग उठला होता. याचदरम्यान उमेश कोल्हे यांनी नूपुर शर्मा यांच्या विधानाचे समर्थन करीत त्यांच्या सोशल मीडियातील पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यानंतर 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने एनआयएला सप्टेंबरमध्ये अतिरिक्त 90 दिवसांची मुदत दिली होती. पेंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार एनआयएने 2 जुलैला आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानच्या कलम 120-ब (गुन्हेगारी कट), 302 (हत्या), 153-अ (धर्म, वंशाच्या आधारावर वेगवेगळय़ा गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) अंतर्गत तसेच बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणी एनआयएने आरोपी मुबशीर अहमद, अब्दुल तौसीफ शेख, मोहम्मद शोएब, शाहरुख खान, आतिक रशीद, युसूफ खान, इरफान खान, अब्दुल अरबाज, मुस्तिक अहमद, शकील शेख आणि शमीम अहमद या 11 आरोपींविरुद्ध शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. उमेश कोल्हे यांची हत्या हा देशातील नागरिकांमध्ये दहशत माजविण्याच्या कटाचा भाग आहे, असेही एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.


























































