अल्पवयीन मुलांना पाकिस्तान बनवतेय दहशतवादी

सामना ऑनलाईन, न्यूयॉर्क

जम्मू आणि कश्मीरातील सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना अल्पवयीन मुलांची भरती करीत असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून समोर आले आहे.

संयुक्त राष्ट्राने गुरुवारी ‘मुले आणि सशस्त्र संघर्ष २०१७’ हा अहवाल प्रसिद्ध केला. पाकिस्तानातील मदरशांसह इतर ठिकाणांहून मुलांची दहशतवादी संघटनांमध्ये भरती होत असल्याचे वृत्त संयुक्त राष्ट्राला मिळत असून आत्मघाती हल्ल्यांसाठी सशस्त्र दहशतवादी संघटना मुलांचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

जानेवारीत तेहरिक-ए-तालिबान संघटनेने आत्मघाती हल्ल्यासाठी मुले आणि मुलींना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा व्हिडीओ व्हायरल केला होता. सशस्त्र गटांकडून सातत्याने शाळांवर आणि विशेषत मुलींवर होणारे हल्ले चिंताजनक असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस ऍण्टोनिओ गुटेर्रेस यांनी सांगितले. पाकिस्तान सरकारने शाळांवर होणारे हल्ले रोखण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानात फेब्रुवारीत सिंध प्रांतातील सेहवान येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २० मुलांसह ७५ जण ठार झाले होते. २०१७मध्ये पाकिस्तानातील शिक्षण संस्था व विद्यार्थ्यांवर ८ हल्ले झाले. याखेरीज शाळकरी मुलींना टार्गेट करणारे ४ हल्ले झाल्याचे अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी हिंदुस्थानात झालेल्या तीन दहशतवादी हल्ल्यांत मुलांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. कश्मीरच्या पुलवामा जिह्यात झालेल्या चकमकीदरम्यान १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. छत्तीसगड आणि झारखंडमध्येही नक्षलवाद्यांनी अल्पवयीन मुलांना हल्ल्यांत सहभागी केले होते. कश्मीरातील हल्ल्यांसाठी जैश-ए-मोहम्मद आणि हिजबूल मुजाहिदीन या संघटना मुलांची भरती करताहेत, असे अहवालात स्पष्ट केले आहे.

पाकिस्तान ‘ग्रे लिस्ट’मध्ये

इस्लामाबाद : दहशतवाद्यांना पुरवण्यात येणारा निधी रोखण्यात अपयश आल्यावरून फाइनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’ म्हणजे संशयित यादीत समाविष्ट केले आहे. एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये गेल्याने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून कर्जे मिळवणे कठीण बनणार आहे. या ग्रे लिस्टमध्ये आपण येऊ नये यासाठी पाकिस्तानने एफएटीएफला २६ सूची ऍक्शन प्लॅन दिला होता. पण त्यात पाकला यश आले नाही. मात्र पाकिस्तान एफएटीएच्या ब्लॅक लिस्टमध्ये येण्याच्या कारवाईतून बचावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या