
सामना प्रतिनिधी, कुडाळ
कोकण रेल्वे मार्गावर कुडाळ ते कणकवली दरम्यान आज एक थरारक घटना घडली. मुंबईकडे जाणाऱ्या एका हॉलिडे स्पेशल रेल्वेचे इंजिन डबे सोडून काही अंतर पुढे गेले. सुदैवाने तेथे रेल्वेचा मोठा अपघात होता होता वाचला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. याबाबत रेल्वे प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली आहे. दरम्यान, रेल्वेचे अधिकारी गिरीश करंदीकर यांनी या घटनेला दुजोरा देत या संपूर्ण घटनेची रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली असल्याची माहिती दिली.
मडगांवहून मुंबईच्या दिशेने रविवारी सायंकाळी 17 डब्यांची ही हॉलिडे स्पेशल रेल्वे जात होती. कुडाळ रेल्वे स्थानकातून ही रेल्वे पुढे मार्गस्थ झाल्यानंतर कुडाळ ते कणकवलीदरम्यान या रेल्वेचे इंजिन डब्यांपासून सुटून काही अंतर पुढे गेले. इंजिन ‘अन-कपल’ झाल्याने हा प्रकार घडला. हा सर्व प्रकार मोटरमनच्या लक्षात येताच प्रसंगावधान राखत मोटरमनने इंजिन ब्रेक केले. दरम्यान, डबे सोडून इंजिन पुढे गेल्याने प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. रेल्वे प्रशासनाचीही मोठी तारांबळ उडाली. इंजिन अन-कपलच्या या घटनेने कोकण रेल्वे मार्गावरील सेवा काही काळ विस्कळीत झाली होती.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱया अन्य गाडय़ा काही काळ रेल्वे स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सुटलेले इंजिन पुन्हा जोडून रेल्वे पुढे मार्गस्थ केली. मात्र यातून रेल्वे प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला असून येथे रेल्वेचा मोठा अपघात होता होता सुदैवाने वाचला. शेकडो प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार बेजबाबदार रेल्वे प्रशासनाने केल्याच्या तीव्र प्रतिक्रिया यावेळी रेल्वे प्रवाशांमधून उमटत होत्या.
प्रवाशी संतप्त
सलग दोन दिवस सुट्टी आल्याने मुंबईकर चाकरमानी तसेच पर्यटक मोठय़ा प्रमाणात कोकणासह गोव्यात दाखल झाले होते. रविवारी सायंकाळी मुंबईकडे जाणाऱ्या या रेल्वेत मोठय़ा प्रमाणात प्रवाशी होते. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सोशल मीडियावरही इंजिन अन-कपलच्या या घटनेचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले असून रेल्वे प्रशासनाने संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.


























































